
स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २८ : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी (ता. २७) फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
या वेळी शिक्षिका आयेशा मिन्ने यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. तसेच इयत्ता आठवीची विद्यार्थीनी सुरक्षा कटारे हिने उत्कृष्ट भाषण केले. तर इयत्ता पाचवी मधील शर्वरी अर्जुन पवार हीने पोवाडा सादर केला.
मुख्याध्यापिका शेख यांनी कविता तालासुरात कशी म्हणावी, मराठी उच्चार कसे करावे, अवांतर वाचन व निबंध लेखनाने स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करावे, असे सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्त्व यावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कथाकथन स्पर्धा व प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका सर्व शिक्षक वृंद व शालेय कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा शिरसाट यांनी केले. संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, सचिव मिलिंद शेलार व शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.