डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण
डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण

डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः ती महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. नियमित तपासण्या झाल्या होत्या. गर्भाची वाढही चांगली होती. पण, डॉक्टरांसमोर आव्हान होते. त्या महिलेला ह्रदयाचा त्रास होता. त्यातही नवव्या महिन्याऐवजी आठव्या महिन्यातच त्यांना बाळंतकळा सुरू झाल्या होत्या. रक्तदाब झपाट्याने वाढला होता. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात दाखल केले. रक्तदाब, ह्रदयविकार व बाळंतपण अशा तिन्ही कसोट्यांवर काम करून महिलेसह बाळाचे प्राण वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे होते. अशा स्थितीत स्रीरोग, प्रसुती, ह्रदयरोग, भूलतज्ज्ञ आणि फिजिशियन डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि त्यांना बाळासह आईचेही प्राण वाचविण्यात यश आले. दहा दिवसांच्या उपचारानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.
नवीन थेरगाव रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी थेरगावमध्येच राहणारी आठ महिन्यांची गर्भवती महिला दाखल झाली. प्रसूती कक्षातील डॉक्टरांनी तपासणी केली. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अत्यवस्थ होती. हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता होती. रुग्ण व बाळ दोघांचाही मृत्यू होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे कमीतकमी वेळेत रुग्णाला शर्तीचे प्रयत्न करून वाचविण्याची जबाबदारी डॉक्टरांची होती. जवळपास दहा-बारा तास अनेक आव्हानांना सामोरे जात अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याचा सुखरुप जन्म झाला होता. डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण त्यांच्यासमोर दुसरे आव्हान राहिले. त्या मातेचे प्राण वाचवायचे होते. ती बेशुद्धावस्थेत होती. डॉक्टरांनी शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. काही तासांनी तिची हालचाल जाणवली आणि सकारात्मक दिशेने विचारांची वाटचाल सुरू झाली. जीव वाचविण्याचे युद्ध अखेर यशस्वी झाले. नवीन थेरगाव रुग्णालयात माता आणि नवजात बालकाला संजीवनी मिळाली. नातेवाइकांच्या चेहऱ्यावर आनंद व डॉक्टरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते होते. डॉ. उमेश साबळे, फिजिशियन डॉ. कृष्णा दळवी व त्यांचे सहकारी, थेरगाव रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, भूलतज्ज्ञ डॉ. नेहा पाटील, डॉ. संजय सोनेकर, डॉ. इलाफ रुमाणी, डॉ. राहुल चव्हाण, वायसीएम रुबी अल केअरचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील, डॉ. महेश असलकर, डॉ. मनीष पवार, भूलतज्ज्ञ शितल बोरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी कराळे, डॉ. नेहा खान यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नातून बाळासह आईला जीवदान मिळाले.

‘आरसीएच पोर्टल’वर नोंद हवी
गर्भवती महिलांची माहिती नोंदण्यासाठी सरकारचे ‘आरसीएच’ (रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ) पोर्टल आहे. त्यावर गर्भवती महिलांची नोंदणी गर्भधारणेनंतर प्रथम तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी करायला हवी. त्यात महिलेची संपूर्ण माहिती नोंद करायची असते. त्याचा नोंदणी क्रमांक (आयडी) मिळतो. त्यामुळे संबंधित महिला कोणत्याही दवाखान्यात वा कोणतेही शहर वा गावातील रुग्णालयात गेली तरी, तिची सर्व माहिती आरसीएच पोर्टलद्वारे डॉक्टरांनी मिळते व उपचार करणे सोईचे होते, अशी माहिती थेरगाव रुग्णालयातील ज्येष्ठ
वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.