पिस्तूल, काडतूस बाळगल्याप्रकरणी काळेवाडीमध्ये तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिस्तूल, काडतूस बाळगल्याप्रकरणी 
काळेवाडीमध्ये तिघांना अटक
पिस्तूल, काडतूस बाळगल्याप्रकरणी काळेवाडीमध्ये तिघांना अटक

पिस्तूल, काडतूस बाळगल्याप्रकरणी काळेवाडीमध्ये तिघांना अटक

sakal_logo
By

पिंपरी : बेकायदरीत्या पिस्तूल व काडतूस बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना अटक केली. ही कारवाई काळेवाडी येथे करण्यात आली. नीलेश भगवान तारू (वय ३२, रा. नंदादीप कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), अक्षय प्रकाश मानकर (वय २२, रा. उत्तमनगर, पुणे), वैभव सुरेश मानकर (वय ३०, रा. पारुदत्त कॉम्प्लेक्स, दांगटनगर, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून हितेश सुरेश मानकर (रा. पारुदत्त कॉम्प्लेक्स, दांगटनगर, शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी नीलेश, अक्षय व वैभव यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नढेनगर येथील पाचपीर चौक -विठ्ठल मंदिर रोड येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोयता, एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक मोकळी काडतुसाची पुंगळी, एक मोबाईल जप्त केला. आरोपींनी हे पिस्तूल व काडतूस हितेश मानकर यांच्याकडून आणले.

साडेचार लाखांचे दागिने लंपास
उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने कपाटातील चार लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार बावधन येथे घडला. बावधन येथील रामनगर कॉलनीतील पेटीयम सोसायटीत राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

भररस्त्यात महिलेचा विनयभंग, मारहाण
भररस्त्यात महिलेशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. महिलेने विरोध केला असता त्यांना मारहाण करीत धमकी दिल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार निगडी येथे घडला. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दशरथ मंगलसिंग साबळे (वय २६, रा. नांदेडगाव, पुणे, मूळ-जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी ही निगडीतील बसथांबा येथे थांबलेली असताना तिच्याजवळ आलेल्या आरोपीने फिर्यादीचा हात पकडला. फिर्यादीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. फिर्यादीने विरोध केला असता त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हात पिरगळून शिवीगाळ केली. ‘माझ्यासोबत आली नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

महिलेवर अत्याचार, मुलीशीही गैरवर्तन
महिलेवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या अल्पवयीन मुलीशीही गैरवर्तन केले. अल्पवयीन मुलीशी लग्न लावून न दिल्यास तिच्या लहान भावांना गायब करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सद्दाम ऊर्फ उजाला जमसेद (वय ३५, रा. पिंपरीगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीशी ओळखीचा फायदा घेऊन त्यांच्याबरोबर अश्लील चाळे केले. जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. या बाबत कोणाला सांगितल्यास फिर्यादीच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीशीही गैरवर्तन केले. ‘फिर्यादी यांना तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याबरोबर लावून दे, नाहीतर मी आपले दोघांचे व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करीन,’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांची दोन्ही मुले डबा देण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली. ‘तू तुझे आईला समजावून सांग, माझे लग्न तुझ्या बहिणीसोबत लावून दे, नाहीतर तुम्हा दोघांना गायब करीन’ अशी धमकी दिली. मुलीशी लग्न लावून देणार नाही, अशी खात्री झाल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलीचे फोटो व अश्लील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केले.

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
दोन फ्लॅट बुक करून पैसे भरले. मात्र, फ्लॅट व पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे . हा प्रकार थरमॅक्स चौक येथे घडला. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीनारायण बुडाती (वय ४४ ), पार्वती बुडाती (वय ४०, दोघेही, रा. हैदराबाद, तेलंगणा), पूर्णचंदर राव, भास्कर नायडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी वीस एकरमध्ये सरवानी इलाईट प्रोजेक्ट प्री लॉन्च केला. त्यामध्ये फिर्यादी, त्यांचे पती व मुलगी यांनी दोन फ्लॅट बुक करून पैसे भरले. मात्र, नंतर फ्लॅट अथवा गुंतविलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.