
... अन् साहेबांच्या खुर्चीवर बसल्यावर जबाबदारीची जाणिव
साहेबांच्या खुर्चीवर आली जबाबदारीची जाणीव
आमदार अश्विनी जगताप यांच्यावर दिवसभरात शुभेच्छांचा वर्षाव
पिंपरी, ता. ३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आमदार झाल्यावर प्रथमच पिंपळे गुरव येथील कार्यालयात आज सकाळी आल्या. गेली पस्तीस वर्षे त्यांचे पती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, हे ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीला त्यांनी आदरपूर्वक नमस्कार केला. आपल्या पतीच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात आल्या. त्यांच्या खुर्चीवर त्या प्रथमच बसल्या होत्या. आपल्यावर असलेल्या जबाबदारीचीही जाणीव झाली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीत जगताप या ३६ हजार १६८ मताधिक्य घेऊन काल निवडून आल्या. मागील २४ दिवसांपासून निवडणुकीच्या धामधुमीत त्या व्यस्त होत्या. काल विजय मिळाल्यानंतरही प्रथम त्या दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या समाधीवर जाऊन त्यांनी दर्शन घेतले.
आमदार झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेसातपासूनच त्यांना पिंपळे गुरव येथील ‘चंद्ररंग’ या त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक, जवळचे पदाधिकारी, कार्यकर्ते भेटायला येऊ लागले. नाष्टा, चहा उरकल्यानंतर त्या पिंपळे गुरव येथील महापालिका शाळेजवळील कार्यालयात गेल्या. याच कार्यालयात बसूनच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेली ३५ वर्षे सुरवातीला नगरसेवक म्हणून व नंतर महापौर, शहराध्यक्ष, आमदार म्हणून या शहराचा कारभार पाहिला.
दिवंगत आमदार जगताप यांच्या हयातीत अश्विनी जगताप यांनी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी अनेक उपक्रम राबविले होते व बचत गटांचे मोठे जाळे निर्माण केले होते. परंतु; त्या लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात कधी जाऊन बसल्या नव्हत्या. आमदार झाल्यावर आज प्रथमच त्या कार्यालयात गेल्या. त्यांना भेटायला पिंपळे गुरव व मतदारसंघातील नागरिक भेटायला येत होते. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत्या.
कार्यालयात आनंदी वातावरण
काही नागरिकांनी आमदार जगताप यांना रखडलेली कामेही सांगितली. काहींना अर्जांवर त्यांची स्वाक्षरी हवी होती. काही नागरीकांनी त्यांना निवेदनेही दिली. भाजपचे काही पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यांना भेटायला व शुभेच्छा द्यायला आले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनी करून, त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, भाजप व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या यांच्यात आनंदाचे वातावरण होते.
मला मतदारांनी निवडून दिले, हे साहेबांनी केलेल्या विकासकामांची पावतीच आहे. साहेबांच्या खुर्चीत मी आज प्रथम बसल्यावर मला आपल्यावर येऊन पडलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. त्यामुळे मी आता साहेबांची अपूर्ण राहिलेली कामे, स्वप्न पूर्ण करणार आहे. स्मार्टसिटीच्या माध्यमातून मला रावेत, किवळे, पुनावळे अशा ज्या भागांचा विकास झाला नाही, त्या भागाचाही विकास करावयाचा आहे.
- अश्विनी जगताप, आमदार, चिंचवड विधभानसभा मतदारसंघ.