पिंपरीतील ९७,६९९ अवैध बांधकामांना लाभ

पिंपरीतील ९७,६९९ अवैध बांधकामांना लाभ

शास्ती माफीचा सरकारचा निर्णय
पिंपरी- चिंचवड महापालिका ः शहरातील ९७,६९९ अवैध बांधकामांना लाभ

पिंपरी, ता. ३ ः अनधिकृत बांधकामांवर आकारला जाणारा शास्ती (दंड) सरसकट अर्थात सर्व प्रकारच्या बांधकामांना माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. त्याचा फायदा पिंपरी-चिंचवड शहरातील ९७ हजार ६९९ बांधकामांना होणार असून, थकबाकीसह ४६० कोटी ६५ लाख रुपये शास्ती माफ होणार आहे. मात्र, मिळकतकराची मूळ रक्कम भरल्यानंतरच शास्ती माफीचा लाभ मिळकतधारकांना मिळणार आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, चार जानेवारी २००८ रोजी व त्यानंतरच्या अनधिकृत बांधकामांना देय मालमत्ताकराच्या दुपटीची रक्कम शास्ती म्हणून लावण्यात आली होती. आठ मार्च २०१९ च्या निर्णयानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी मालमत्तांना शास्ती माफ केला. परंतु, एक ते दोन हजार चौरस फुटांपर्यंत निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के आणि दोन हजार चौरस फुटांपुढील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ताकराच्या दुप्पट शास्ती होती. उर्वरित बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक मालमत्तांनाही दुप्पट दराने शास्ती होती.

माफीचा निर्णय का?
अवैध बांधकामांच्या शास्ती रकमेचे प्रमाण मालमत्तांच्या मूळ करापेक्षा अधिक होते. त्यामुळे मूळ कर आणि शास्ती भरण्यास नागरिकांमध्ये उदासीनता होती. शास्ती माफ होईल, या हेतूने मूळ करही भरला जात नव्हता. शास्ती माफ झाल्यास मूळ कराचा भरणा होऊन महापालिकेचे उत्पन्न वाढेल, या उद्देशाने शास्ती माफ केल्याचे सरकारने आदेशात म्हटले आहे.

शास्ती माफीच्या अटी व शर्ती
- मूळ कर भरल्यानंतर शास्ती माफ होईल
- शासन आदेश निघण्याच्या तारखेपर्यंतच्या अवैध बांधकामांना शास्ती माफ
- शास्ती माफ म्हणजे बांधकाम नियमित झाले असे नाही
- शास्ती माफीमुळे महापालिका सरकारकडे नुकसान भरपाई अथवा आर्थिक सहाय्य मागणार नाही

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शास्ती माफ करण्याची घोषणा केली होती. त्याबाबत ‘जीआर’ लवकरच काढू, अशी घोषणा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकारने ‘जीआर’ प्रसिद्ध केला.
- महेश लांडगे, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड

असा आहे मूळ कर
थकबाकी ः २२६.२१ कोटी
चालू कर ः ८४.०६ कोटी
एकूण ः ३११.१७ कोटी
(मूळ कर भरावा लागणार)

अशी आहे शास्ती
थकबाकी ः ३८६.६० कोटी
चालू ः ७३.९५ कोटी
एकूण ः ४६०.५५ कोटी
(माफ होणारी रक्कम)

एकूण येणे महसूल
थकबाकी ः ६१२.८१ कोटी
चालू ः १५८.९१ कोटी
एकूण ः ७७१.७२ कोटी
(शास्ती वगळून ३११.१७ कोटी मूळ कर येणे)
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com