तिन्ही उमेदवारांचे प्रचारप्रमुख उद्योजक व निकटवर्तीय चिंचवड पोटनिवडणूक ः प्रचाराचे नियोजन, माध्यम, आर्थिक जबाबदारीचे नियोजन

तिन्ही उमेदवारांचे प्रचारप्रमुख उद्योजक व निकटवर्तीय
चिंचवड पोटनिवडणूक ः प्रचाराचे नियोजन, माध्यम, आर्थिक जबाबदारीचे नियोजन

जयंत जाधव

पिंपरी, ता. ४ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील तीनही प्रमुख उमेदवारांचे साधर्म्य म्हणजे तीनही उमेदवारांचे प्रचारप्रमुख हे उद्योजक व कुटुंबातील निकटवर्तीय होते. त्यांनी समर्थपणे आपली जबाबदारी हाताळल्याचे दिसून येते.
भाजप मित्रपक्षाच्या अश्‍विनी जगताप या ३६ हजार १६८ मतांनी विजयी झाल्या. नाना काटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची ९९ हजार ४३५ मते घेतली. हा महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या मतांचा परिणाम होता. तर; कलाटे यांनी एकाकी झुंज देत ४४ हजार ११२ मते मिळविली.
या मतदारसंघात ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार होते. त्यामुळे राज्यातील मतदारसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठा असलेल्या या मतदारसंघात प्रचाराचे नियोजन करताना मोठी कसरत होती. त्यामुळे विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक म्हटले की प्रचारप्रमुखाची मोठी जबाबदारी असते. अर्थात यामध्ये माध्यम, सोशल मीडिया, प्रचाराचे नियोजन, आर्थिक जबाबदारी अशा महत्त्वाच्या गोष्टी या प्रचारप्रमुखांना हाताळाव्या लागतात.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर शोककळा होती. परंतु; शंकर जगताप यांनी अतिशय धीरोदात्तपणे शांततेत ही जबाबदारी पेलली. सुरवातीला उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे होते. मात्र; पक्षाने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वहिनी अश्‍विनी जगताप यांना उमेदवारी दिली व प्रचारप्रमुखाची जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर टाकली. त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता, संपूर्ण प्रचाराची सूत्रे व्यवस्थित हलवली.

शंकर जगताप यांचा थेट सहभाग
भाजपच्या अश्‍विनी जगताप यांचे प्रचारप्रमुख भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यावर होती. जगताप यांच्या अनेक निवडणुकांचा पूर्वानुभव त्यांच्याकडे होता. शंकर जगताप हे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीमधील स्टारप्रचार नेत्यांच्या सभा लावण्यापासून ते बूथ कमिट्यांच्या नियोजनापर्यंत सर्व यंत्रणा लावली. माध्यम व सोशल मिडियावरील प्रचाराच्या यंत्रणेचे नियोजन केले. त्यांनी प्रचारप्रमुख म्हणून १०० टक्के व प्रत्यक्ष प्रचारात नागरिकांमध्ये जाऊन ५० टक्के काम केले. विभागवार नागरी प्रश्‍न, सोसायट्यांचे प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा व बैठकांचे नियोजन करून, त्या प्रश्‍नांवर तोडगा काढला.

भोईर प्रचारप्रमुख तर; ‘बॅकबोन’ नंदकुमार काटे
नाना काटे यांचे प्रचारप्रमुख म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने भाऊसाहेब भोईर यांच्यावर जबाबदारी टाकण्यातआली होती. भोईर स्वत:ही राष्ट्रवादीकडे इच्छुक होते. परंतु; त्यांनी कोणतेही नाराजी व्यक्त न करता प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. उमेदवाराची दिवसभराची कार्यपत्रिका ठरवून त्यानुसार उमेदवाराबरोबर राहून अंमलबजावणी करण्याचे काम ते करत होते. त्याचबरोबर प्रमुख लोकांच्या, विविध समाजाच्या गाठीभेटी, बैठकांचे आयोजन ते करत होते. तर; माध्यम, सोशल मीडिया आदींच्या नियोजनाची जबाबदारी नाना काटे यांचे बंधू व हॉटेल व्यावसायिक नंदकुमार काटे यांच्यावर होती. प्रचाराच्या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून, जेथे कमतरता असेल तेथे लक्ष घालून प्रचारातील स्थानिक नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या ते समस्या सोडवत होते.

नवनाथ जगताप प्रचारप्रमुख तर; निम्हण पडद्यामागे
वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे प्रचारप्रमुख म्हणून माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्याकडे जबाबदारी होती. प्रचाराच्या नियोजनाबरोबरच ते प्रत्यक्ष पदयात्रा, सभा, बैठकांमध्ये उमेदवार कलाटे यांच्याबरोबर कायम ठामपणे उभे होते. नवनाथ जगताप हे दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे पुतणे असले तरी ते कलाटे यांचे जिवलग मित्र व कट्टर समर्थक असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी होती. तर; माध्यम, सोशल मिडीयावरील प्रचार आदी नियोजनाची ‘बॅकबोन’ म्हणून जबाबदारी राहुल कलाटे यांचे मावसबंधू व बाणेर येथील हॉटेल व्यावसायिक चंद्रकांत निम्हण
यांच्याकडे होती. त्यांनी कलाटे यांचे ‘वॉररुम’ सांभाळले व पडद्यामगची भूमिका पार पाडताना ‘जेथे कमी, तेथे आम्ही’ अशी महत्त्वाची भूमिकाही पार पाडली.

फोटोः 28589, 28585, 28581

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com