विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेच्या छळप्रकरणी 
सासरच्या पाच जणांवर गुन्हा
विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

sakal_logo
By

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती आशिष दिगंबर बांगर (वय ४३, रा. बावधन), सासरा दिगंबर गोविंद बांगर (वय ६५), दिर अभिजित बांगर (वय ४०), सासू (वय ६०) व नणंद (वय ४२, सर्व रा. अकोला) व एक महिला (वय ३५) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पती, सासू, सासरा, दिर व नणंद हे फिर्यादीला कोणताही त्रास देणार नाही, असे शपथपत्र देवून फिर्यादीने त्यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणावरून पतीने फिर्यादीला त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ व मारहाण केली. या बाबत फिर्यादीने सासू, सासरा, दिर व नणंद यांना कळविले असता ‘तुला तुझ्या नवऱ्यासोबत संसार करायचा होता ना आता कर, नसेल जमत तर त्याला सोडून निघून जा’ असा फिर्यादीलाच दम दिला. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला फोन करून फिर्यादीला त्रास देण्याबाबत भडकवले. सर्वानी मिळून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पतीने एका महिला आरोपीशी बेकायदेशीर लग्न केले. याबाबतचे फोटो महिला आरोपीने फिर्यादीला दाखवून शिवीगाळ करीत आशिष सोबतचे संबंध तोडून टाक, नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात दिलेले पैसे व सोन्याच्या दागिन्यांची फिर्यादीने मागणी केली असता ते परत देण्यास नकार दिला. पैशाचा व सोन्याचा अपहार केला.

महिलेवर अत्याचार, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी, ता. ४ : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. महिलेला मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुनीश शर्मा व शुभम शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच कंपनीत कमला होते. मुनीष याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या क्रेडिट कार्डवरून साठ हजार रुपये खर्च केले. फिर्यादीला हाताने मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हाताला चावा घेऊन दुखापत केली. मुनीश याचा भाऊ शुभम याने स्वतःच्या फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटवर फिर्यादीबाबत अश्लील पोस्ट केली. फिर्यादीची बदनामी करून त्यांच्या आई वडिलांना घरात घुसून मारून टाकण्याची धमकी दिली.

वाकडमध्ये दोन पिस्तूल जप्त
बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला वाकड पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. करण गजानन चोपवाड (वय २३, रा. शिवराजनगर कॉलनी, रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जगताप डेअरी येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल व काडतुसे जप्त केली.


ऑनलाइन २१ लाखांची फसवणूक
ऑनलाइन एकवीस लाख रुपये ट्रान्स्फर करून घेत फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. आनंद दिगंबर शुक्रे (रा. वन नेशन सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयसीआयसीआय बँकेचे अकाउंट नावावर असलेला मंताजुल इस्लाम मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनीच्या नावावर असलेला वोडाफोन-आयडिया कंपनीचा मोबाईल क्रमांक डिऍक्टिव्हेट करण्याबाबत वोडाफोन-आयडिया कंपनीला मेल पाठवला. सिमकार्ड डिऍक्टिव्हेट करून संबंधित मोबाईलला कनेक्ट असलेल्या परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनीच्या नावाचे कॅनरा बँकेच्या खात्यावरून २१ लाख रुपये ट्रान्स्फर करून घेत आरोपीने आर्थिक फसवणूक केली.

तरुणाची दोन लाखांची फसवणूक
तरुणाची ऑनलाईनवरून दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे घडला. युसूफ जब्बार शेख (रा. विकासनगर, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने एचडीएफसी बँक खात्याची केवायसी पेंडिंग असल्याबाबतचा खोटा मेसेज फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवला. त्यामधील फसव्या लिंकद्वारे एचडीएफसी बँकेसारखे बनावट पेज ओपन होऊन त्यामध्ये फिर्यादीने भरलेले त्यांचे बँक खात्याचे तपशील आरोपीने मिळवले. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख ९९ हजार ७७८ रुपये प्राप्त करून घेत फसवणूक केली.