
आमिषांना बळी पडू नका, सावध राहा
पिंपरी, ता. ५ ः शादी डॉट कॉम वरून त्यांनी ओळख झाली. प्रेमात रुपांतर झाले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून सुखी संसाराची स्वप्नेही दाखवली. जवळीक साधत शारीरिक संबंध ठेवले. वेगवेगळ्या कारणांनी पैसेही घेतले. नंतर लग्नास नकार दिला. तिची फसवणूक केली. आता तिच्यासमोर मोठे संकट उभे आहे. एकत्र काम करताना, वेडिंग साइटवर जोडीदार शोधताना, सोशल मीडियावर चॅटिंग करताना होणाऱ्या ओळखीतून अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांकडील तक्रारींवरून दिसतंय. त्यावर, कोणत्याही आमिषासा बळी पडू नका. वरवरच्या गोष्टींना भुलू नका. सावध राहून पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन समुदेशक व पोलिसांनी केले आहे.
प्रेमाचे जाळे ः लग्न करून समोरची व्यक्ती जीवनसाथी बनणार असते. अशा भावी जोडीदारासह त्याच्या कुटुंबाचीही सविस्तर माहिती घेणे आवश्यक असते. मात्र, तसे होताना दिसत नाही. विश्वास ठेवल्याचा गैरफायदा घेऊन प्रेमाच्या ओढल्या गेलेल्या मुलींची मात्र फसवणूक होते.
नकार दिल्यास हल्ला ः फसवणूक, छळ केल्यानंतर प्रेमास, लग्नास नकार दिला असता महिलांवर हल्ला केल्याच्याही घटना घडत आहेत. खून, जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचे समोर येत आहे.
महिनाभरातील घटना
- पिंपरी, २२ फेब्रुवारी ः मोरवाडीत शादी डॉट कॉमवरून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले. त्यानंतर फसवणूक
- चिंचवड, २३ फेब्रुवारी ः लग्नाचे आमिष दाखवून, नंतर मुलांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार. लग्न न करता दुसरीशी लग्न
- म्हाळुंगे एमआयडीसी, २४ फेब्रुवारी ः एकाच कंपनीत काम करताना झालेली ओळख व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध
- हिंजवडी, २६ फेब्रुवारी ः मारण्याची धमकी व लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले, विश्वास संपादन करून घेतलेले सहा लाख परत केले नाही
- निगडी, २७ फेब्रुवारी ः सोशल मीडियावरून मैत्री झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार
- सांगवी, १ मार्च ः शादी डॉट कॉम साईटवरून ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले. वैयक्तिक अडचण सांगून १९ लाखांची फसवणूक
- चिखली, २ मार्च ः लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास तरुणींसह तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी
- हिंजवडी, ३ मार्च ः लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न व बदनामी करून साठ हजारांची फसवणूक
- म्हाळुंगे एमआयडीसी, ता. ः म्हाळुंगे येथील कंपनीत कामाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
भावनांमध्ये, खोट्या स्वप्नामध्ये वाहत गेल्यास नुकसान होते. वास्तवात जगण्याचा प्रयत्न करावा. केवळ वरवर दिसणाऱ्या गोष्टींची भुरळ पडू देऊ नका. स्वतःला कोणत्या तरी कामात व्यग्र ठेवा. जोडीदार निवडताना त्याची व त्याच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
- वंदना मांढरे, समुदेशिका
आपल्याबाबत काही चुकीचे घडत असल्यास वेळीच सावध व्हा. महिलांना मदतीची गरज भासल्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या महिला सहायक कक्षाशी संपर्क साधावा. पीडित महिलेला आवश्यक सर्व मदत केली जाईल. समोरच्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊनच त्याच्याशी संपर्क ठेवा.
- प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.