खेकसून म्हणे.. ‘स्माईल प्लीजऽऽऽ’

खेकसून म्हणे.. ‘स्माईल प्लीजऽऽऽ’

‘‘ए स्माईल प्लीज....सरळ बघ ना. मी बोललेलं तुला कळत नाही का? का बहिरा- बिहरा झाला आहेस? की वेड्याचं सोंग घेतलं आहेस? कॅमेऱ्याकडं बघून थोडं हस. नाहीतर दोन फटके टाकेल.’’ फोटोग्राफरने दहा
वर्षाच्या पोराला दमात घेत म्हटले.
‘‘अहो लहान मुलांशी असं बोलतात का? जरा प्रेमाने समजावून सांगा.’’ आम्ही फोटोग्राफरला सल्ला दिला.
‘‘हा तुमचा मुलगा आहे का? वाटलंच मला. चेहऱ्यावरून तुमच्यासारखाच नेभळट दिसतोय.’’ फोटोग्राफरने मलाच सुनावले. त्यावेळी आमची भंबेरी उडाली.
‘‘वाट्टेल ते काय बोलताय? हा माझा मुलगा नाही. माझ्या बायकोनं ऐकलं असतं म्हणजे तिला भांडणाला एक विषय मिळाला असता. माझी बायको व मुलगा बाहेर थांबलेत.’’ आम्ही खुलासा केला.
‘‘ओ काका, काय फालतूची बडबड लावलीय. साधा आयडेंटी कार्डसाठीचा फोटो काढायला तास लावताय. आधी ते लेन्सवरचे कव्हर काढा. हाय रिझोल्युशनमध्ये फोटो काढा.’’ मुलाने आवाज चढवला. मग फोटोग्राफरने त्याचा फोटो काढला.
‘‘तुमचं काय काम आहे?’’ फोटोग्राफरने आम्हाला दमात घेतले.
‘‘ज्वारीचं दळण पटकून दळून द्या.’’ आम्ही म्हटले.
‘‘तुमचं काय डोकं फिरलाय काय? फोटोग्राफीच्या दुकानात कोणी दळण दळायला येतं का?’’ फोटोग्राफरने रागाने म्हटले.
‘‘एवढं कळतं ना? मग आम्ही कशाला आलो असेल, हे कळत नाही का? आम्हाला फॅमिली फोटो काढायचाय.’’ आम्ही म्हटले. मग मी बायकोला बोलावून आणले व मुलासह आम्ही दोघे फोटो काढायच्या पोझमध्ये उभे राहिलो.
ॊॊाॆाॆ‘‘तुम्हाला चेहऱ्याचा फोटो हवाय की पोटाचा हवाय. चेहऱ्याचा हवा असेल तर पोट आतमध्ये घ्या.’’ फोटोग्राफरने सूचना दिली.
‘‘तुम्हाला हजारवेळा सांगितलं असेल. तेवढं पोट कमी करा. आता फोटो काढताना आली ना अडचण.’’ बायको आमच्यावर करवादली.
‘‘स्माईल प्लीज...’’ फोटोग्राफरने खेकसून म्हटले. मात्र, आमचा दीड वर्षाचा शुभम हसण्याऐवजी रडायला लागला.
‘‘अले लब्बाडा, समोलचं माकड बघ. तिकलं बघून जला हास.’’ बायकोने लाडेलाडे बोलत समोर बोट दाखवले.
‘‘ओ माकड कोणाला म्हणताय? मी माकड वाटलो का?’’ फोटोग्राफरने रागाने म्हटले.
‘‘अहो लहान मुलाची समजूत घालावी लागते.’’ असं म्हणून तिने माझ्या कडेवर शुभमला दिले.
‘तुम्ही गाढवाचा आवाज काढून, शुभमला हसवा’ असा आदेश तिने मला दिला. आम्हीदेखील पडत्या फळाची आज्ञा म्हणून गाढवासारखं ओरडू लागलो.
‘‘आई, मला शू लागलीय.’’ शुभमने म्हटले.
‘‘अले आपण नंतर शू कलायची. या घाणीत कोणी शू कलतं का?’’ शुभमच्या आईने समजूत घातली.
‘‘माझ्या दुकानाला घाण काय म्हणताय?’’ फोटोग्राफर पुन्हा डाफरला.
कशीबशी फोटोग्राफर व शुभमची आम्ही समजूत घातली.
‘‘अहो, फोटो चांगले काढा. मला फेसबुकवर टाकायचेत. दोनशे तरी कमेंटस मिळाल्या पाहिजेत.’’ बायकोने म्हटले.
‘‘थोडं हसा.’’ फोटोग्राफरने असं म्हटल्यावर बायको हसू लागली.
‘‘अहो एवढंही वेड्यासारखं हसायचं नाही. स्मितहास्य करा.’’ फोटोग्राफरने सूचना दिली.
‘‘तुम्ही आम्हाला हसण्याचे प्रकार शिकवू नका. हास्यक्लब मी जॉईन केलाय. तिथं मी रोज पंचवीस हसण्याचे प्रकार करते. तळजाईवर एकदा या. तुम्हालाही शिकवते.’’ बायकोने माहिती पुरवली. त्यानंतर फोटोग्राफरने फोटो काढला व लगेचच त्याची प्रिंट दिली. तो फोटो पाहूनच आमचा राग अनावर झालाय.
‘‘कोणाचा हा भंगार फोटो आहे. हा ढेरपोट्या माणूस कोण आहे?’’ आम्ही रागाने म्हटले.
‘‘अहो, भंगार कोणाला म्हणताय? तुमच्या बायकोला तरी ओळखा.’’ फोटोग्राफरने म्हटले.
‘‘अहो, या ढेरपोट्या माणसाला क्रॉप करून, मुलाचा व माझाच फोटो द्या.’’ बायकोने असं म्हटल्यावर आमचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com