
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
सोमाटणे, ता. ७ ः जोराचा वारा व मेघ गर्जनेसह आज पवनमावळ पूर्व भागात सव्वा तास पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. आज सकाळपासून हवेत प्रचंड उकाडा वाढला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली, विजांचा लखलखाट व मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सव्वा तास पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे पवनमावळातील शेतकरी वर्गाची धांदल उडाली. काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. या पावसामुळे दिवसभराचा उकाडा कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला. पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला, फुलशेती व आंब्याचे अल्पशा प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे होळीच्या सणावर विरजण पडले, तर अनेकांना होळी पेटवताच आली नाही. साडेसात वाजण्याच्या सुमारास पाऊस उघडल्यानंतर होळीचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.