
गुन्हे वृत्त
पाण्याचा फुगा फेकून मारल्याच्या वादात दोघांवर वार
पिंपरी : पाण्याने भरलेला फुगा फेकून मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी बाप लेकावर कोयत्यासारख्या हत्याराने वार केले. ही घटना काळेवाडी येथे घडली. अभिषेक हौसराव बचाटे (वय २०, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबानगर , काळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे तापकीर चौक येथून घरी पायी जात होते. दरम्यान, रस्त्यावर असलेल्या तीन आरोपींपैकी एकाने फिर्यादी यांना पाठीमागून पाण्याने भरलेला फुगा फेकून मारला. त्याबाबत फिर्यादी यांनी मागे फिरून विचारणा केली. कोणाला मस्ती, कोणी मला पाण्याने भरलेला फुगा मारला, असे बोलताच आरोपींना राग आल्याने एका आरोपीने फिर्यादीच्या कानशिलात मारली. तर दुसऱ्याने फिर्यादीला धक्काबुक्की करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज एकूण फिर्यादीचे वडील हौसराव बचाटे हे त्यांना वाचवायला आले असता एका आरोपीने हौसराव यांच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने वार केला. फिर्यादी त्यांच्या वडिलांना वाचवायला मध्ये पडले असता त्यांच्यावरही वार केला. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
----------------------
दाम्पत्याला मारहाण करून महिलेचा विनयभंग
दाम्पत्याला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार देहूरोड येथे घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीन शेख (रा. देहूरोड बाजार), जलील शेख (रा. देहूरोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला.
--------------
खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर गुन्हा
बांधकाम साइटवर मालाच्या गाड्या खाली करण्यासाठी पैसे मागणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सूस येथे घडला. रवींद्र वाघू तुपे (रा. आंबेगाव, बुद्रूक पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश ससार (रा. सूस, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सूस येथील व्हीटीपी स्कायलाईट टाऊनशिप या साइटवर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या येणाऱ्या दोन गाड्या आरोपीने अडवल्या. स्टोअर इनचार्ज, कामगार व गाड्यांवरील चालक व क्लीनर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरडा करून दहशत निर्माण करून शिवीगाळ, दमदाटी केली. प्रत्येक गाडी खाली करण्याचे पन्नास हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर गाड्या खाली करू देणार नाही, असा धाक दाखवून कमी भाड्यात होणाऱ्या कामाचे जास्तीचे पैसे खंडणी स्वरूपात मागितले.
-----------------
सुरक्षारक्षकाला मारहाण करून ऐवज लुटला
सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटल्याची घटना पिंपरी येथे घडली. विमलेश कुमार सत्यनारायण रावत (रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे वल्लभनगर येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. दरम्यान, फिर्यादी हे काम करीत असलेल्या ठिकाणी आरोपी आले. फिर्यादीकडे पैशांची व मोबाईल फोनची मागणी केली असता फिर्यादी यांनी नकार दिल्याने कशाच्या तरी साहाय्याने त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. अंधाराचा फायदा घेऊन फिर्यादी यांचा मोबाईल व रोकड घेऊन पसार झाले.
--------------------
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, तिघे जखमी
दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना वाकड येथे घडली. किशोर हनुमंत जोगदंड (वय २८, रा. गोडांबे चौक, रहाटणी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर हा वाकड फाटा बाजूकडून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने त्याच्या मित्रांसह दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात किशोरचा मृत्यू झाला. तर त्याचे मित्र विकास शेळके, श्रीकृष्ण नारनाळे व दुसऱ्या दुचाकीवरील चालक देवेंद्र कापसे हे जखमी झाले.
-----------------------
घरफोडीत दागिने लंपास
घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने
चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना पिंपरी येथे घडली. मयूर दत्तात्रेय कांबळे (रा. म्हाडा टॉवर, पिंपरी वाघेरे, पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरले.
-----------------
विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडीतील फेज एक येथे घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कैपु मधुसूदन रेड्डी व व्यंकटेश वरलू रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मधू रेड्डी हा दोन महिला घेऊन आला व त्यांना फेज एक येथील सोसायटीतील फ्लॅटमध्ये ठेवले. याबाबत फिर्यादी विचारण्यासाठी गेले असता कैपु याने फिर्यादीस शिव्या दिल्या व तु इथून बाहेर निघून जा, नाहीतर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच फ्लॅटमध्ये जात असताना व्यंकटेश याने फिर्यादीशी गैरवर्तन केले.
----------------------
पैशांसाठी विवाहितेचा छळ
पैशांसाठी पतीने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार भोसरीतील स्पाईन रोड येथे घडला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. पराग ठकूजी थोरवे (वय २९, रा. श्रीराम कॉलनी, स्पाईन रोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी पतीने फिर्यादी महिलेला पैशांसाठी वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. तसेच नांदवण्यास नकार देत फिर्यादीचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ केला.