
भोसरीतील तलाव तीन वर्षापासून बंद
पिंपरी, ता. ७ : भोसरी येथील सहल केंद्राजवळील जलतरण तलाव ऐन उन्हाळ्यात बंद आहे. गेली तीन वर्षे हा जलतरण तलाव बंद आहे. एप्रिल २०२२ पासून सर्व निर्बंध हटविल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील अनेक जलतरण तलाव सुरु झाले आहेत. परंतु; भोसरीतील व इतर काही ठिकाणचे तलाव अद्याप बंद का आहेत?, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना विचारला आहे.
तलावाच्या बाहेरील गेटवर बंद असण्याबाबत कोणतेही कारण लिहिलेले नाही. तलाव बंद असल्यामुळे भोसरी परिसरातील नागरिकांना, लहान मुलांना व जलतरणपटू यांना पोहण्याच्या आनंदापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने यात लक्ष घालून भोसरीतील हा तलाव चालू करून, तो सुस्थितीत व सुरक्षित राहील हे पाहावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे ॲड. गोडांबे यांनी केली आहे.
फोटोः 29109