
गुन्हे वृत्त
सव्वा दोन लाखांचा
थेरगावात गांजा जप्त
पिंपरी, ता. ८ : बेकायदारित्या गांजा बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख तीस हजारांचा गांजा जप्त केला. ही कारवाई थेरगाव येथे करण्यात आली. राहुल विठ्ठल जाधव (वय २२), शालिवन आप्प्पाराव वाडी (वय ३२, दोघेही रा. रा. ता. कमलापूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थेरगाव येथे रस्त्याच्या कडेला सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करून अंगझडती घेतली असता दोन लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा नऊ किलो ३०० ग्राम वजनाचा गांजा आढळला. या आरोपींकडून गांजासह वीस हजारांचे दोन मोबाईल, रोख रक्कम व एक मोटार असा एकूण सात लाख ५२ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मारहाणप्रकरणी
तिघांवर गुन्हा
पिंपरी, ता. ८ : शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मामुर्डी येथे घडला. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम स्वामी राजले, राज राजले, राणी राजले (सर्व रा. शीतलानगर, गुलमोहर सोसायटी, मामुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी घरी असताना त्यांच्या घरासमोर गोंधळ सुरु झाल्याने काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी घराबाहेर आल्या असता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली. धमकी देत दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
विवाहितेच्या छळप्रकरणी
सासरच्यांवर गुन्हा
पिंपरी, ता. ८ : विवाहितेला शिवीगाळ , मारहाण करीत तिचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरीतील शास्त्री चौक येथे घडला. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुरेश ऊर्फ जितू धनराज वाघ, दीर विजय धनराज वाघ व सासू (रा. न्याहळादेता, जि.धुळे), नणंद, दिलीप पाटील (रा. पंचवटी मखलाबाद, स्वामीमग, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना वारंवार शिवीगाळ करून अपमानित केले. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करीत माहेरी पाठवत होते. पतीने फिर्यादीला दुसरीकडे घरकाम करण्यास भाग पाडले. तसेच मुलगा दत्तक देण्याच्या कारणावरून फिर्यादीवर दबाव टाकून त्यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.
सव्वा लाखांची
ऑनलाइनद्वारे फसवणूक
पिंपरी, ता. ८ : ऑनलाइनद्वारे एकाची सव्वा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी येथे घडला. प्रकाश रमेश अडवानी (रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे एका साइटवर नोकरी शोधत असताना त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून एका क्रमांकाच्या व्हाट्सअपवर मेसेज केला. त्यानंतर टेलिग्रामवर संपर्क साधण्यास सांगून फिर्यादी यांची एक लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
सराईत वाहन
चोरटा जेरबंद
पिंपरी, ता. ८ : सराईत वाहन चोरट्यासह त्याच्या साथीदाराला जेरबंद करण्यात देहूरोड पोलिसांना यश आले. आरोपींकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. बुद्धदेव बिष्णु बिश्वास (वय २४), देवाशिष मधुसूदन बिश्वास (वय ३३, दोघेही, रा. सांगवी, मूळ- पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस गस्त घालत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संशयितांकडे पोलिस चौकशी करीत असताना त्यातील एकजण पळून गेला. पळून गेलेल्या संशयिताला मोबाईल लोकेशनवरून कल्याण रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेतले. या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पाच दुचाकी व मोबाईल त्यांच्या साथीदारांसह चोरल्याचे सांगितले. या आरोपींकडून देहूरोड, रावेत, शिरगाव या पोलिस ठाण्यातील
प्रत्येकी एक तर चतुःशृंगी ठाण्यात दोन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून पाच लाख ७४ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी व एक मोबाईल जप्त केला. बुद्धदेव याच्यावर पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण वीस गुन्हे दाखल आहेत. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.