
हरिनामाच्या गजराने देहू ‘तुकोबामय’ सुमारे तीन लाख भाविकांच्या साक्षीने बीज वारीचा सोहळा
देहू, ता. ९ ः इंद्रायणीचा काठोकाठ भरलेला तीर.. तुकाराम-तुकाराम नामाचा अखंड जयघोष...टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर...रणरणत्या उन्हात भक्तिभावाने कीर्तन ऐकणारे लाखो भाविक...दुपारी ठीक बारा वाजता ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल’ जयघोष झाला अन् लाखो भाविकांनी पुष्पवृष्टी केली. अशा भक्तिरसात चिंब झालेल्या बीज सोहळा राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीन लाख भाविकांनी डोळ्यात साठविला.
सकळिकांचे समाधान ।
नव्हे देखिल्यावांचून ।।
रुप दाखवी रे आता।
सहस्त्रभुजांच्या मंडिता।।
शंखचक्रपद्यगदा।
गरुडासहित ये गोविंदा ।।
तुका म्हणे कान्हा ।
भूक लागली नयनां ।।
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्याप्रमाणे वैष्णव भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी वैकुंठगमन सोहळा अनुभवला. सदेह वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जशी जवळ येत होती, तशी टाळमृदंग आणि ‘तुकाराम तुकाराम’ नामघोषाने देहूनगरी दुमदुमून गेली होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांनी दुपारी साडेबाराला नांदुरकीच्या झाडाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली. तुकोबारायांना मनोमन नमस्कार करून आपली वारी त्यांच्या चरणी रुजू केली.
संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीनला काकडा आरती झाली. पहाटे चारला ‘श्रीं’ची महापूजा संस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. पहाटे साडेपाचला वैकुंठस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. सकाळी साडेदहाला फुलांनी सजवलेल्या पालखीत संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखीने वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखीच्यापुढे सनई चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. वैकुंठस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील ‘घोटविन लाळ ब्रम्हज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविण,’ या अभंगावर कीर्तन झाले. वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आरती झाली. विश्वस्त माणिक महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरपंचायत सदस्य बंडा काळोखे, प्रांताधिकारी संजय असवले, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड आदी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य देऊळवाड्याकडे आगमन झाले.
विक्रमी गर्दी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष बीज वारी झाली नाही. मागील वर्षी काही प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे तेवढी गर्दी झाली नव्हती. यंदा मात्र देहूत मोठी गर्दी झाली होती. पुणे, आळंदी, तळेगाव या बाजूने सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने भरून गेले होते. जवळपास दोन किलोमीटर लांब वाहने रोखण्यात आल्याने भाविकांना चालत यावे लागले. भाविकांसाठी बस स्थानक गावाबाहेर ठेवण्यात आल्याने देहूत अंतर्गत वाहतूक कोंडी कोठेही झाली नाही. पोलिसांनी गर्दीचे चांगले नियोजन केले.
देहू ः संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने इंद्रायणीचा तीर फुलून गेला होता.
फोटो ः २९४५८