
अंतर्गत हेवेदाव्यांमुळे ‘राष्ट्रवादी’चा पराभव इच्छुकांपैकी काहींनी आपल्या भागात पूर्ण ताकदीने काम केले नसल्याची चर्चा
जयंत जाधव
पिंपरी, ता. ९ : अंतर्गत हेवेदाव्यांमुळे महाविकास आघाडीची एकत्रित ताकद असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसला चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली व ३६ हजार १६८ मतांनी त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. शिवसेनेचे बंडखोर व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. मतांची आकडेवारी पाहिली तर; तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झाला, हे उघड सत्य आहे. परंतु; कलाटे हेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काटे व कलाटे यांना एकत्र बसवून एक नाव द्या, ‘एकाने लोकसभा लढवा, एकाने विधानसभा लढवा,’ असा सल्ला देवून एकत्र बसवण्याचाही प्रयत्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. परंतु; त्यालाही यश आले नाही व अखेर तिरंगी लढत झाली.
आमदार बनसोडे नाराज?
पक्षाने मावळचे आमदार सुनील शेळके यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षक म्हणून सुमारे दोन वर्षांपूर्वीच नियुक्त केले होते. अजित पवार नेहमी तरुण नेतृत्वाला वाव देतात. सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत २०१९ मध्ये प्रवेश करून, भाजपचा २५ वर्षे बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात माजी मंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करून आमदार झाले. परंतु; काल पक्षात आलेल्या तरुण आमदारांना आमच्याकडे नेतृत्व म्हणून पाठवले, अशी भावना पक्षातील काही जुन्या नेत्यांची होती. त्यामुळे ते आतून दुखावले होते. याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे या पोटनिवडणुकीच्या प्रचारात फारसे दिसलेच नाहीत. त्यातच आमदार बनसोडे हे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मित्र असल्याने त्यांनी सुरवातीलाच ही निवडणूक बिनविरोध जगताप कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणीही केली होती. त्यामुळे पक्षातील काही जुनी नेतेमंडळी नाराज असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात होती. त्यातच आमदार बनसोडे यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनातून प्रवास केल्याचा व्हिडिओही समाज माध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाला होता.
हेवेदाव्यांमुळे मताधिक्य घटले
नाना काटे हेही तरुण उमेदवार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील १० इच्छुकांपैकी भाऊसाहेब भोईर वगळता अन्य इच्छुकांनी आपल्या भागात पूर्ण ताकद लावून काम केल्याचे दिसून आले नाही. भोईर यांच्या चिंचवड भागातही भाजपलाच मताधिक्य जादा आहे. नाना काटे आमदार झाल्यास १० वर्षे हटणार नाहीत, या भावनेने अन्य इच्छुक मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे आदी इच्छुकांच्या भागातही काटे यांना मताधिक्य दिसत नाही. शहराध्यक्ष अजित गव्हाणे व त्यांच्या ‘टीम’ने बुथनुसार बांधणी करून निरीक्षक नेमले व कार्यकर्त्यांचे जाळे प्रचारात सक्रिय केले. परंतु; अजित गव्हाणे या तरुण अध्यक्षांच्या नेतृत्वात चिंचवडला राष्ट्रवादीचा आमदार झाल्यास आपले काय, या भावनेनेही काही जणांनी ‘हातचे राखून’ काम केले. पिंपळे निलखला भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करूनही फारसा फरक पडला नाही. त्या भागात भाजपलाच मताधिक्य मिळाले. त्यातच नाना काटे सर्व इच्छुकांची मोट बांधण्यात व स्वत:च्या भागात मोठे मताधिक्य मिळविण्यात अपयशी ठरले. त्यामुळे अजित पवार यांनी चिचवडमध्ये तळ ठोकून प्रचार केला, बैठका घेतल्या परंतु; काटे यांना अपेक्षित मते मिळू शकली नाहीत.
‘‘खरेतर या पोटनिवडणुकीत दुरंगी लढत असती तर चित्र वेगळे दिसले असते. पराभव झाल्यावर अनेक चर्चा होतात. पण पराभवाची अंतर्गत वाद, हेवेदावे ही कारणे नाहीत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जीव ओतून व चांगले काम केले. भाजप व विरोधकांनी शेवटच्या टप्प्यात ’अर्थनिती’चा अवलंब केला व पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांचे मताधिक्य वाढले.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड.