
भव्य मिरवणुकांनी दणाणला परिसर
पिंपरी, ता. १० : भगवे ध्वज हातात घेऊन ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा, ढोल-ताशांच्या गजरातील भव्य मिरवणुका, ठिकठिकाणी ऐकू येणारा पोवाडा यासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी (ता. १०) शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
शिवनेरीसह जवळच्या गड किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त मध्यरात्री अथवा पहाटेच रवाना झाले. सकाळी ढोल ताशांच्या गजरात शिवज्योतीचे आगमन झाले. घरोघरी, मोटारीवर तसेच रस्त्यावरही ठिकठिकाणी भगवे ध्वज उभारले होते. चौकाचौकात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुंदर सजावट करून पोवाडा लावण्यात आले होते. दुपारनंतर मिरवणुकीच्या तयारीला वेग आला. रोषणाईसह सजावटीचे भव्य सेट उभारले होते. ढोल -ताशा पथक, मर्दानी खेळ, बँड पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. सातच्या सुमारास मिरवणुकांना प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या.
चिखलीत ‘एक गांव एक शिवजयंती’
श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथे शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने "एक गांव एक शिवजयंती" उत्साहात साजरी झाली. यानिमित्त चिखलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. शुक्रवारी शिवनेरीहून आण लेल्या शिवज्योतीचे अनेक ग्रामस्थांनी पूजन केले. यानंतर महिलांनी पारंपरिक वेष परिधान करून शिवजन्मोत्सव साजरा केला. तर सायंकाळी भव्य मिरवणुकीत आई तुळजाभवानी देखावा , अश्वारूढ शिवपुतळा , धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा, पारंपरिक पालखी , बैलगाडी , राजस्थानी नृत्य ,अनेक नामवंत ढोलताशा पथकांनी परिसर दणाणून सोडला. ‘चिखली मॅरेथॉन’ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये बीड, लातूर ,पुणे अशा विविध शहरातून एकूण अडीच हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध योग्य प्रात्यक्षिके सादर केली. तर अभिषेक विद्यालय चिंचवडच्या मुलांनी मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. महिलादिनानिमित्त होममिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला. गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तर सायंकाळी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनास हजारो लोकांनी उपस्थिती लावली. असे आदी उपक्रम मागील आठवडाभरात पार पडले.
पिंपरीत कार्यक्रम
मातोश्री सामाजिक संस्था व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पिंपरीतील शगुन चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी राहुल कलाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गणेश आहेर, अनिता तुतारे, वैभवी घोडके, यास्मीन शेख, पूनम रिटे, हनुमंत पिसाळ, सचिन लिमकर, आधिकराव भोसले, मारुती म्हस्के, गणेश पाडुळे, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार आदी उपस्थित होते.