
गुन्हे वृत्त
पिंपळे निलखमध्ये टोळक्याने
माजवली दहशत; प्राणघातक हल्ला
पिंपरी, ता. १० : एकावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. दुकानातील रोख रक्कम लुटून वाहनांची तोडफोड केली. ''आम्ही या भागातले भाई आहोत'', असे म्हणत दहशत माजवली. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला. स्वप्नील अच्युतराव गायकवाड (वय २४, रा. पिंपळे निलख) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी समीर राजेंद्र इंगवले (रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा सैफन शेख (वय २९, रा. पिंपळे गुरव) व रामा हनुमंत कांबळे (वय २६, रा. बाणेर) यांना पोलिसांनी अटक केली असून सोन्या क्षीरसागर, अक्षय अहिवळे (रा. पिंपळे गुरव) व इतर तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे विशालनगर येथे अंडी विक्रीचे दुकान असून त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार अनिश मुरकुटे याचा भाऊ सौरव याचे अक्षय अहिवळे याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपी फिर्यादी यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी कामगार अनिश याला हॉकी स्टिकने मारले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गाडीवरील चालक स्वप्नील गायकवाड याच्या डोक्यात हॉकी स्टिक मारून प्राणघातक हल्ला केला. यात स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील ट्रेमधील अंडी फोडून नुकसान केले. दमदाटी करीत दहशत निर्माण केली. दुकानाच्या काउंटर मधून ४८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. अनिश याने आणलेल्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी पळून जाताना आणखी एका दुकानदाराला मारहाण केली.
पूर्ववैमनस्यातून तिघांना बेदम मारहाण
जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील अजंठानगर येथे घडली. मरीअप्पा यकप्पा धोत्रे (रा. अजंठानगर, चिंचवड), सुनील डोंगरे, सोमनाथ शिंदे अशी जखमींची नावे आहेत. धोत्रे यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक मुकेश कांबळे, रोहित ज्ञानेश्वर दंडगुले, साहिल रशीद पठाण, सोन्या बगाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राजू ठोसर, विजय ठोसर, नाना कांबळे, आंबू कांबळे, तुषार मुकेश कांबळे व इतर तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा भाचा नागेश पवार याच्या सोबत आंबू कांबळे, रोहित दंडगुले व साहिल पठाण यांचे भांडण झाले होते. त्या भांडणावरून रोहित दंडगुले याने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादी यांच्या नाकावर, सुनील डोंगरे यांच्या गालावर व सोमनाथ शिंदे यांच्या हातावर, छातीवर मारले.
पिंपरीत तरुणाकडील ऐवज लुटला
रस्त्यात अडवून धमकी देत तरुणाकडील ऐवज लुटला. ही घटना जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे घडली. प्रवीण मनोज शिरसाट (वय २३, रा. रांजणगाव एमआयडीसी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कामावरून सुटल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कंपनीच्या बस मधून जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे उतरले. तिथून ते बीआरटी रोड ओलांडून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी फिर्यादी यांना अडवले. आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन. तुला पुलावरून फेकून देईन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले असता चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशात जबरदस्तीने हात घालून २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीला एका फोन पे नंबरवर चौदाशे रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर चोरटे पसार झाले.
डूडूळगावात अडीच लाखांची घरफोडी
दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्य्या चोरट्याने अडीच लाखांचे दागिने चोरले. ही घटना डूडूळगावमध्ये घडली. सोमनाथ अशोक जाधव (रा. शास्त्री चौक, भोसरी. मूळ रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे घर कुलूप लाऊन बंद असताना दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरटा आत शिरला. घरातून दोन लाख ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.