भव्य मिरवणुका, मर्दानी खेळ अन सामाजिक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भव्य मिरवणुका, मर्दानी खेळ अन सामाजिक उपक्रम
भव्य मिरवणुका, मर्दानी खेळ अन सामाजिक उपक्रम

भव्य मिरवणुका, मर्दानी खेळ अन सामाजिक उपक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती शहरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. भव्य मिरवणुका, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ, सुंदर सजावट यासह सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा गजर सुरु होता.

‘एक गाव , एक शिवजयंती’ या उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना यांच्यामार्फतही विविध उपक्रमांचे आयोजन देखील केले होते. मिरवणुकीमध्ये महिलांसह लहान मुले, मुली डोक्याला पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. काही चिमुकल्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. भगवे झेंडे, रांगोळीच्या पायघड्या, पोवाडा असे प्रसन्न वातावरण सर्वत्र होते. शुक्रवारी रात्रीपर्यंत मिरवणूक सुरु होत्या. चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत केले जात होते. पोलिसांच्या सूचनेनुसार वेळेतच मिरवणुकीची सांगता करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त केला होता. कार्यकर्त्यांनीही चोख नियोजन केले होते. काळेवाडी येथे अखिल काळेवाडी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी चिखलीतील साने चौक येथे जाणता राजा प्रतिष्ठानने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. घरकुल येथे राजमुद्रा प्रतिष्ठानने मर्दानी खेळ व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. पिंपरीतील रिव्हर रोड येथेही मिरवणूक काढण्यात आली. दिघीतील सह्याद्री युवा प्रतिष्ठाननेही मिरवणुकीचे आयोजन केले होते. निगडीतील दत्तवाडी येथे शिवचरित्र या विषयावर व्याख्यान झाले. जुनी सांगवीतील मराठा साम्राज्य एकता मंडळाने मिरवणूक काढली.