बनावट प्रमाणपत्र तयार करून शाळेसह महापालिकेची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट प्रमाणपत्र तयार करून 
शाळेसह महापालिकेची फसवणूक
बनावट प्रमाणपत्र तयार करून शाळेसह महापालिकेची फसवणूक

बनावट प्रमाणपत्र तयार करून शाळेसह महापालिकेची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी : एका शैक्षणिक संस्थेचे अधिकृत फायर सेफ्टी प्रमाणपत्र काढून ते सीबीएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम दिलेल्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे बनवून शाळा व पिंपरी - चिंचवड महापालिकेची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला. शिवप्रकाश श्यामसुंदर आसोपा (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल मदान (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या चिंचवड येथील हिंद चॅरिटेबल ट्रस्टचे एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक संस्थेचे पिंपरी - चिंचवड महापालिकेकडून अधिकृत फायर सेफ्टी प्रमाणपत्र काढून ते सीबीएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम आरोपीला दिले होते. आरोपीने योग्य त्या शासकीय पद्धतीने फायर सेफ्टी प्रमाणपत्र काढून ते सीबीएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक होते. मात्र, त्याने बनावट फायर सेफ्टी प्रमाणपत्र तयार करून शैक्षणिक संस्था व पिंपरी - चिंचवड महापालिका यांची फसवणूक केली.

बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
भरधाव बसच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे घडली. लालमणी जयस्वाल असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्यामनाथ हरीगेन जयस्वाल (रा. भोसरी, मूळ - उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश शहाजी भोसले (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा त्याची बस जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरून घेऊन जात होता. सोमाटणे फाटा येथे लालमणी हे पायी जात असताना भरधाव बसची त्यांना जोरात धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हिंजवडीत ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण
महिला वाहतूक पोलिसाला ओरडून बोलल्याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांनी ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण केली. ही घटना हिंजवडी येथे घडली. ट्रॅफिक वॉर्डन सुनील शिवाजी बिराजदार (वय २३, रा. ज्ञानदा कॉलनी, ताथवडे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव सुदाम दुडे (वय २४, रा. कोथरूड) याला अटक केली आहे. तर प्रतीक विजय दुडे (वय २२, रा. कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे लक्ष्मी चौक येथे महिला पोलिस नाईक माने यांना मदतनीस म्हणून काम करीत होते. माने यांनी कारवाईसाठी दोन महिलांच्या गाड्या थांबवल्या. यावेळी आरोपी दुडे मोठ्याने ओरडून महिलांना चांगला फाइल मारा, असे माने यांना म्हणाला. त्यावर वॉर्डन बिराजदार हे दुडे यांना उद्देशून ''आपल्या घरातही महिला असतात, असे बोलू नये'', असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपींनी बिराजदार यांना शिवीगाळ करीत हातातील कड्याने तोंडावर मारून जखमी केले.

विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल
माहेराहून काहीही आणत नसल्याने तसेच काही कमवत नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. हा प्रकार सूस येथे घडला. या प्रकरणी विवाहितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती सुबोध जैन (वय ४२) व ताराचंद जैन (वय ७७, रा. सूस, ता. मुळशी. मूळ रा. मध्यप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून त्या काही कमवत नाहीत, तसेच माहेरहून काहीही घेऊन आल्या नाहीत, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना शिवीगाळ केली. पती सुबोध याने फिर्यादीला मारहाण केली. सुबोध हा दुसऱ्या मुलीला घेऊन राहत असल्याबाबत फिर्यादीने जाब विचारला असता त्यांना धक्काबुक्की करून मारहाण करीत धमकी दिली.


रहाटणीत महिलेचा विनयभंग
चित्रपटगृहाच्या शौचालयात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना रहाटणी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला, त्यांचा भाऊ व पती हे रहाटणीतील एका मॉलमधील चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होत्या. चित्रपट सुरु होण्यापूर्वी फिर्यादी शौचालयात गेल्या. त्यावेळी
आरोपीने महिलांच्या शौचालयात येऊन फिर्यादीसोबत गैरवर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.