
प्राथमिक शिक्षकांना वरीष्ठ व निवड वेतनश्रेणी लागु करण्याची मागणी
पिंपरी, ता.१२ ः प्राथमिक शिक्षकांना वरीष्ठ व निवड वेतनश्रेणी लागु करण्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष संतोष उपाध्ये, जिल्हाध्यक्ष शरद लावंड, कार्याध्यक्ष संतोष शितोळे, सरचिटणीस मंगेश भोंडवे यांच्या स्वाक्षरी आहेत.
निवेदनात म्हटले आहे, ७६ शिक्षकांना वरीष्ठ व २७ शिक्षकांना निवड वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव साडेतीन वर्षापासून प्रलंबित आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये याच विषयावर आंदोलनाचा पवित्रा संघटनेने घेतला होता. त्यावेळी शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी यांनी १५ दिवसात प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. याला सहा महिने होत आले आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार लागू असलेली १०-२०-३० अशी आश्वासित प्रगती योजना इतर महापालिका कर्मचारी यांना लागू होण्यासाठी त्यांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र शिक्षकांना योजना अद्याप लागू नसल्यामुळे किमान वरीष्ठ व निवड वेतनश्रेणी तरी वेळेवर लागू होणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत शिक्षण विभागाकडून विनाकारण दिरंगाई होत आहे.