पद प्रतिष्ठेपेक्षा नाव महत्त्वाचे : शेळके

पद प्रतिष्ठेपेक्षा नाव महत्त्वाचे : शेळके

तळेगाव स्टेशन, ता. १२ : विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळ तालुक्यासाठी मंजूर झालेल्या विकास निधीवरुन आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक सुरुच आहे. माजी आमदार संजय भेगडे यांच्या वडगावमधील शनिवारच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (ता.१२) तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडण केले. गेल्या तीन वर्षांतील विकासनिधीची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांपैकी सरकार बदलल्यानंतर साधारणः १२ कोटी रुपयांच्या कामाची स्थगिती उठवली गेलेली नाही.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत २०१९ ते २०२३ पर्यंत नगरोत्थान, दलितेतर, ठोक तरतूद, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रस्ते, गटार योजनांसाठी ३८ कोटी, नगर परिषद इमारतीसाठी १८ कोटी ८० लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवास सुधारणा कामासाठी एक कोटी १२ लाख, सामाजिक सभागृह ४७ लाख, कब्रस्तान परिसर सुधारणा ४० लाख, विद्युत शवदाहिनीसाठी ६० लाख, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीसाठी तीन कोटी ९१ लाख, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी ४० लाख ७६ हजार असा एकूण ६३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली. या बरोबरच लोणावळा नगर परिषदेसाठी ९२ कोटी १५ लाख, वडगाव नगरपंचायत ८१ कोटींचा, देहू नगरपंचायत ३२ कोटी ८४ लाख रुपये, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कामांसाठी तरतुदीतून सात कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
पद प्रतिष्ठेपेक्षा नाव महत्त्वाचे असल्याचे नमूद करतानाच माझ्या कुटुंबावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी जनतेचा पैसा घरात आणू शकत नाही, असेही आमदार शेळके म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, संजय बाविस्कर आदी मान्यवर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सुनील शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com