गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला मोशीत धक्काबुक्की
पिंपरी : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला धक्काबुक्की करीत सरकारी अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार मोशी येथे घडला. उदय रामचंद्र भोसले (रा. ड्रीम्स रिदम सोसायटी, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश बाबूराव थोरात (वय ४१, रा. प्राधिकरण, मोशी) याला अटक केली आहे. फिर्यादी हे महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता आहेत. ते मोशी प्राधिकरणातील आशियाना बिल्डिंग येथे कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या मीटरच्या तपासणीचे काम करीत होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा वापरली. तसेच फिर्यादीचे सहकारी रमेश सूळ यांच्या मोटारीच्या टायरमधील हवा सोडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
----------------------
तरुणाला तिघांनी केली बेदम मारहाण
पिंपरी : माफी मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. हा प्रकार भोसरी येथे घडला. ज्ञानेश्वर ऊर्फ सागर ऊर्फ बारकू मारुती गवळी (रा. दिघीरोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय भोसुरे (वय ३२, रा. राजवीर हौसिंग सोसायटी, आळंदी रोड, भोसरी) व त्याचे दोन कामगार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून वाद झाला असता त्याची माफी मागण्यासाठी फिर्यादी हे फुगेवस्ती येथील भोसुरे बिल्डिंग मटेरिअल अँड सॅण्ड सप्लायर्स या दुकानात गेले होते. तेथे आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले.
-------------------
वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या स्पा सेंटरवर छापा
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली. ही कारवाई पिंपळे सौदागर येथील शिवार चौक येथे करण्यात आली. निवृत्ती प्रकाश पाटील (वय २६, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर, मूळ- जळगाव) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालक मालकाचे नाव आहे. आरोपीने योग दी स्पा येथे स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्याने स्वतः ची उपजीविका भागवली. दरम्यान, या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
------------------------
फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
जमीन विक्रीत नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगाव गावठाण येथे घडला. शांताराम श्रीपती जगताप (रा. थेरगाव गावठाण) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी महिलेच्या कुटुंबाची मालकी हक्क व ताबा वहिवाटीची थेरगाव गावठाणामध्ये जमीन आहे. आरोपी महिलेने कोणाशी तरी संगनमत करून या जमिनीचा बनावट नकाशा तयार केला. ती जमीन दुसऱ्या सर्व्हेमधील असल्याचे भासवून लोकांना नोटरी दस्त करून जमीन विकली. त्या मोबदल्यात महिलेने लोकांकडून मोठ्याप्रमाणात पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. तसेच यापूर्वी या जमिनीची मोजणी करून गाडलेल्या खुणा काढून
त्याची विल्हेवाट लावली.
------------------------
पैसे परत मागितल्याने तरुणाला मारहाण
उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सांगवी येथे घडली. रोनित विजय खेडेकर (रा. ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित डॅनिअल तोरणे (वय २२, रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी हे मित्र असून खेडेकर यांनी तोरणे याला चार हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे घेण्यासाठी खेडेकर हे दुचाकीवरून तोरणे याच्या घरी गेले. तोरणे हा खेडेकर यांच्या दुचाकीवर बसून घराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात आला. तिथे तोरणे याने खेडेकर यांना बेदम मारहाण करून तेथून पसार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com