
दक्षता समिती सदस्यांचा तळेगावमध्ये सन्मान
तळेगाव स्टेशन, ता. १२ ः महिला दिनानिमित्त तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने दक्षता समितीच्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून दक्षता समितीच्या महिला सदस्यांनी केक कापण्यात आला. तसेच सन्मान करण्यात आला. त्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत म्हणाले, ‘‘महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. त्यातून त्यांना स्वातंत्र्य आणि अधिकारही मिळाले आहेत. मात्र, सध्याच्या काळात अध्यात्माच्या नावाखाली काही धार्मिक संस्था महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहेत. नको त्या गोष्टींना महत्त्व देवून त्यांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटत आहे. त्यांनी काय कपडे घालावेत, यावरही बंधने लादली जात आहेत. हे योग्य नाही.’’
विद्या काशीद म्हणाल्या, ‘‘महिला ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवणारे अजब रसायन म्हणजे घरातील महिला असते. मात्र, सध्याच्या काळात महिलांना स्वतःला सावरले पाहिजे. आनंदी राहायला शिकले पाहिजे. ती आनंदी असेल तर कुटुंब आनंदी होईल. त्यातूनच समाज आनंदी राहू शकतो. बंधनमुक्त राहण्याबरोबर संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. जीवनातील भीती गेली की निर्भयता आपोआप येते. ती निर्भयता आली तरच महिला दिन साजरा करण्यात अर्थ आहे.’’
सहायक पोलिस निरीक्षक कोंडिभाऊ वालकोळी, गोविंद चव्हाण उपस्थित होते. पोलिस नाईक काजल आघाव यांनी आभार मानले.