सहा वर्षांत शहर आदर्श करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा वर्षांत शहर आदर्श करणार
सहा वर्षांत शहर आदर्श करणार

सहा वर्षांत शहर आदर्श करणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः महापालिकेचा सहा कोटी ३० लाख रुपये शिल्लक रकमेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी स्थायी समितीपुढे सादर केला. यात आरंभीच्या पाच कोटी ७० लाख रुपये शिल्लक रकमेसह पाच हजार २९८ कोटी ३० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तर, पाच हजार २९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजनांसह सात हजार १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आहे.
लोकप्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. ओबीसी आरक्षण, राज्य सरकारचे सत्तांतर, न्यायप्रविष्ट बाबी अशा विविध कारणांनी महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे १४ मार्च २०२३ पासून प्रशासकांच्या हाती महापालिकेचा कारभार असून आयुक्तांचीच नियुक्त प्रशासक म्हणून सरकारने केली आहे. सुरुवातीची सहा महिने प्रशासक म्हणून राजेश पाटील यांनी काम पाहिले. त्यांची बदली झाल्यानंतर १६ ऑगस्टपासून आजपर्यंत शेखर सिंह प्रशासक आहेत. त्यांनीच मंगळवारी (ता. १४) महापालिका अर्थसंकल्प सादर केला. मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती दिली. मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पाटील, उल्हास जगताप, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

२०३० पर्यंत आदर्श शहर
देशातील सर्वात सर्वसमावेशक, राहण्यास सक्षम व आदर्श शहर २०३० पर्यंत बनवण्याच्या दृष्टिकोन ठेवला आहे. त्यासाठी नागरिक केंद्रबिंदू मानून पायाभूत सुविधांसह सांस्कृतिक व सामाजिक बाबींचा विचार केला आहे. विविध सामाजिक, आर्थिक घटकांच्या गरजा आणि आकांक्षांचा समतोल साधण्याचे आव्हान असल्याने आरोग्यदायी, पर्यावरण पूरक आणि शाश्वत संकल्पनाचा सर्वसमावेशक विचार केला आहे. त्या माध्यमातून शाश्वत, गतिशील, पर्यावरण पूरक राहणीमान, क्रीडा पर्यटन आणि सांस्कृतिक, कायदा व सुव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान व आर्थिक विकास या घटकांवर काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकात्मिक विकास संकल्पनेनुसार सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करून रस्ते, पूल रुग्णालये, क्रीडांगणे, शाळा अशा बाबींच्या निर्मितीवर भर दिला आहे. शहर सुलभ, दळणवळण, आधुनिक वैद्यकीय सेवा व शैक्षणिक गुणवत्ता वाढून वेगवेगळ्या खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यायोग्य बनविण्याचा मानस आहे. सीएसआरअंतर्गत मदत करणाऱ्या संस्था आणि प्रतिष्ठाने, शहरातील नागरिकांसोबत शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणे शक्य होणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

मिळकतकरात वाढ नाही
राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांना लावलेला शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही मिळकतकरात कोणतीही वाढ होणार नाही. मात्र, महापालिकेकडे नोंदणी नसलेल्या मिळकतींची नोंदणी करून उत्पन्न वाढविण्यावर भर असेल. अशा सुमारे २५ ते ३० हजार नवीन मिळकती असतील. तसेच, अनधिकृत नळजोड अधिकृत करून उत्पन्न वाढविण्यात येईल. सुमारे २० ते २५ हजार अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याचे उद्दिष्ट आहे. अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी अमृत योजनेचा आधार घेतला जाणार आहे. त्याअंतर्गत तीन हजार रुपये अनुदान मिळत असते. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पातून येत्या वीस दिवसात पाणीपुरवठा करण्याचा विषय मार्गी लागेल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

नवीन महापालिका भवन
चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर समोरील जागेत महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. ती पर्यावरणपूरक असेल. त्यात तीन तळघरांसह १८ मजले असतील. एकूण बांधकाम ९० हजार चौरस प्रस्तावित आहे. ६४० चारचाकी व तीन हजार ८०० दुचाकी क्षमतेचे वाहनतळ असेल. ३०० सभासद व १५० नागरिक असे ४५० आसन क्षमतेचे सभागृह असेल. तसेच दोन हजार १०० कर्मचारी ६०० नागरिकांसाठी पुरेशी जागा असेल.

पायाभूत सुविधा प्रकल्प
- महिंद्रा कंपनीकडून ताब्यात आलेल्या जागेत अत्याधुनिक मध्यवर्ती अग्निशामक केंद्र व प्रशिक्षण केंद्र असेल. त्यासाठी १०० कोटी रुपये अपेक्षित खर्च
- प्राधिकरणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नविन मध्यवर्ती ग्रंथालय
- मोशी येथील सहा हेक्टर जागेवर ७५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार, भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय
- जुना मुंबई-पुणे महामार्ग (१२ किलोमीटर), यशवंतनगर ते फिलिप्स चौकापर्यंत टेल्को रस्ता (३.५ किलोमीटर), धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर रावेत रस्ता (१.२० किलोमीटर) आणि बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक रस्ता (१.८० किलोमीटर) अर्बन स्ट्रीट डिझाईन योजनेनुसार सुशोभीकरण
- मोशी येथे १२ एकर जागेवर स्टेडियम उभारणार
- पिंपरीगाव, पिंपळे सौदागर आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी
- वाल्हेकरवाडी ते औंध रावेत रस्त्याचे काम पूर्ण करणे
- कासारवाडीतील नाशिक फाटा ते शंकर मंदिर ते पिंपळे गुरव जोडणार पवना नदी लगतचा रस्ता अद्ययावत करणे
- चिखली येथे टाऊन हॉल विकसित करणे.
- पिंपरी चौकालगत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे
- वाकड येथील आरक्षण क्रमांक ४/२३ मध्ये शाळेची कामे करणे
- दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग शाळेची नवीन इमारत बांधणे
- पवना नदीवर थेरगाव व चिंचवड जोडणारा १८ मीटर रुंदीचा बटरफ्लाय पूल बांधणे
- वायसीएममधील नवजात शिशू अतिदक्षता विभाग व डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण

पाणीपुरवठा विभाग
- भामा आसखेड प्रकल्पात वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारणे
- आंद्रा प्रकल्पांतर्गत अशुद्ध जलउपसा केंद्र, जलवाहिनी टाक्यासाठी उर्वरित कामे करणे
- दुर्गादेवी टेकडीवर १६ दसलक्ष लिटर क्षमतेची साठवण टाकी बांधणे
- सेक्टर २३ येथे वाढीव क्षमतेचे नवीन पंप बसविणे. १५०० व १२०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिन्या टाकणे
- १४०० मिलिमीटर व्यासाच्या दोन समांतर वाहिन्या टाकणे
- निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून सांगवी, दापोडीपर्यंत १००० ते ६०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनी टाकणे
- निगडी ते सांगवी-दापोडीपर्यंतच्या वाहिन्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गालगतच्या भागाचा पाणीप्रश्न सुटणार

पर्यावरण, जलनि:सारण, आरोग्य
- शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प घेतला हाती
- नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कर्ज रोख्याद्वारे निधी उभारण्यासाठी सरकारने दिली मंजुरी
- मुळा नदीवर वाकड पूल ते सांगवी दरम्यान ८.८० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम एप्रिल २०२३ पासून सुरू
- शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पाच प्रमुख चौकात ‘मिस्ट टाइप वॉटर फाऊंटन’ उभारणार
- घरगुती धोकादायक कचरा व स्वच्छता विषयक कचऱ्यावर प्रतिदिनी चार टन प्रक्रीया करण्यासाठी दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन
- झोपडपट्टी स्वच्छ करण्यासाठी शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल सुरू करणार
- महिला बचत गटांना कचरा संकलनाची जबाबदारी
- महिला बचत गटांना उपजीविकेचे साधन निर्माण करणे
- महिला बचत गटांना दरमहा आर्थिक मोबदला दिला जाणार
- यांत्रिकी मॅन्युअल कचरा कम्पोस्टिंग मशिन उपलब्ध करणार
- ‘नवी दिशा’ महिला गटांना स्वच्छतागृह नूतनीकरणासाठी निधी दिला जाणार
- ‘नवी दिशा’ अंतर्गत महिलांना सामुदायिक स्वच्छतागृह चालविण्यासाठी आवश्‍यक वस्तू देणार
- ऊर्जेचा पर्यायी स्तोत्र वाढविण्यासाठी मोशीत ७०० टीपीडी क्षमतचे १४ एमडब्लू वीज निर्मितीचा ‘डब्ल्युटीइ’ प्रकल्प मेपासून सुरू
- शहर आरोग्यदायी होण्यासाठी यांत्रिकी स्विपिंग मशिनद्वारे ६७० किलोमीटर क्षेत्र स्वच्छ होणार
- हॉटेलमधील कचऱ्याचे बायोगॅसमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प एप्रिल २०२३ मध्ये कार्यान्वित
- मोशीतील १५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे ढीग संपविणार
- ‘अमृत १.०’ योजने अंतर्गत पिंपळे निलख येथे १२ एमएलडी, बोपखेल येथे ५ एमएलडी, चिखली येथे १२ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रकिया केंद्राचे बांधकाम प्रगतिपथावर
- ‘अमृत २.०’ योजने अंतर्गत भोसरी-दिघी परिसरात ४५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकिया प्रकल्प प्रस्तावित

वैद्यकीय विभाग
- महापालिकेच्या वतीने कर्करोग (कॅन्सर) रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर सुरू करणार
- तालेरा रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी सेवा, वृद्धांसाठी रुग्णालय
- सामाजिक प्रभाव बॉंड (सोशल इम्पॅक्ट बॉंड) च्या माध्यमातून आरोग्य सेवांच्या दर्जा वाढवून सर्व रुग्णालये व दवाखाने ‘एनएबीएच’ प्रमाणित करणार
- महापालिका नवीन ए. आय. तंतत्रज्ञानाचा वापर करून स्क्रीनिंग व निदान सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार
- पीपीपी तत्त्वावर कर्करोग रुग्णालय
- मासूळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरू करणार
- तालेरा रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी सेवा
- तालेरा रुग्णालयात वृद्धांसाठी रुग्णालय
- थेरगाव रुग्णालयात ट्रामा सेंटर, पूर्ण क्षमतेने सर्जरी
- थेरगाव रुग्णालयात नेत्रविभाग, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया विभाग
- कै. प्रभाकर कुटे रुग्णालयात डायलिसिस, सर्जरी, अस्थिरोग विभाग
- वायसीएम रुग्णालय अद्ययावत करणे
- महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दंत चिकित्सा सुविधा
- वायसीएम रुग्णालयात अद्ययावत दंत उपचार सुविधा

सार्वजनिक, खासगी भागीदारीतील कामे
- कर्जरोख्यांद्वारे मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन
- अण्णासाहेब मगर स्टेडिअमचा क्लबहाऊस, बहुउद्देशीय इनडोअर हॉल, स्पोर्टस् अकादमी असा विकास
- विविध ठिकाणी इलेक्‍ट्रिकल वाहनांसाठी (ईव्ही) चार्जिंग स्टेशन उभारणी
- विविध ठिकाणी उद्याने विकसित करणे
- ७५ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारणी
- बीआरटीएस रस्त्यांचे सुशोभीकरण
- सुमारे २६ एकर भूखंडावर सीटी सेंटर उभारणार, त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा