
सोमाटणे टोलनाक्यावर सर्व कारला सवलत टोलनाका हटाव कृती समितीचे आंदोलन आश्वासनानंतर मागे
तळेगाव स्टेशन, सोमाटणे, ता. १४ : पुढील निर्णय होईपर्यंत सोमाटणे टोलनाक्यावर राज्यातील सर्व कार आणि मावळातील वाणिज्य वाहनांना सवलत देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीला दिले. त्यानंतर
बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका कायमस्वरुपी हटविण्यात यावा, या मागणीसाठी गतवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या आंदोलनातील आश्वासनांबाबत प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाने, जमीर नालंबद, नीलेश पारगे, योगेश पारगे, प्रशांत मराठे आदी तळेगाव दाभाडे येथील जोशीवाडीतील विठ्ठल मंदिरात शनिवारी (ता. ९) दुपारपासून बेमुदत उपोषणास बसले होते.
सोमवारी (ता. १३) रात्री अचानक निर्णय होऊन, सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीचे कार्यकर्ते जमा होणार असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज मंगळवार (ता.१४) सकाळपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वडगाव मावळ ते निगडी दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा बंद करण्यात आली होती.
टोल नाका परिसरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले होते. यावेळी
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, ‘‘मावळातील जनतेने रस्ते, धरण, एमआयडीसी, संरक्षण विभागासाठी जमिनी दिल्या असून, सतत मावळावर अन्याय केला. आणखी नियमबाद्य टोलचा भुर्दंड त्यांच्यावर का टाकला, असा सवाल त्यांनी केला. आमच्या मागण्यांचा तातडीने विचार कारावा, आम्हाला कायद्याचा धाक दाखवून अडवण्याचा, नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केल्यास ती मोडून काढू, असा इशारा दिला.
भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, ‘‘या अनधिकृत टोलनाक्याच्या माध्यमातून रस्त्याच्या खर्चासाठी आठशे कोटी वसुली करणे गरजेचे असताना संबंधित विभागाने अडीच हजार कोटी रूपये वसूल केले. शिवाय टोलवसुलीची मुदत २०३० पर्यंत वाढवली. हे नियमबाह्य असल्याने तो तात्काळ बंद करावा. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवणार.’’
‘आरपीआय’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे म्हाणाले, ‘‘आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला कारण नसताना तीनशे त्रेपन्न कलम लावून गुन्हे दाखल केले जातात, हे अन्यायकारक असून हा प्रकार थांबवा अन्यथा मावळची जनता रस्त्यावर उतरेल.’’
राष्ट्रवादी काँग्रसेचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, ‘‘अनधिकृत असलेला सोमाटणे टोलनाक्यासाठी कृती समिती दोन वर्षापासून लढा देत असून, आता आमचा अंत न पाहता टोलनाका तात्काळ बंद करा.’’
शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर म्हणाले की अनधिकृत असलेला सोमाटणे टोलनाका तातडीने बंद करा. अन्यथा पुढील आंदोलन उग्र स्वरुपाचे असेल. भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे म्हणाले, ‘‘आजचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाचे शेवटचे आंदोलन असून, पुढील आंदोलन हिंसक होऊ शकते.’’ नगरसेवक किशोर भेगडे, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार यांनीही टोलनाका बंद करण्याची मागणी केली. संतोष दाभाडे व सुशील सैंदाने यांनी सूत्रसंचालन केले.
गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनस्थळी पोचले. आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, सोमाटणे टोलनाका हलविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत सर्व मोटारीला सवलत तर मावळातील स्थानिक वाणिज्य वाहनांना पथकरात सवलत देण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले. त्यानंतर चव्हाण यांनी किशोर आवारे यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडले.
आंदोलनात बाळासाहेब घोटकुले, बाळासाहेब नेवाळे, गणेश काकडे, नितीन घोटकुले, भारत ठाकूर, राकेश मु-हे, संतोष दाभाडे, आदींसह मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते.
----------------------------------------------------
फोटो ओळी : सोमाटणे टोलनाका : मोठ्या संख्येने एकवटलेले टोलनाका हटाव कृती समितीचे कार्यकर्ते.