गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

पिंपरीत तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी, ता. १४ : किरकोळ वादातून एकाला चौघांनी मिळून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.

तौफिकचाँद शेख (रा. पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम रोकडे (वय २०), अक्कू भोरे (वय १९), विशाल आहिरे (वय २४), अनिकेत उर्फ अंड्या गायकवाड (वय १९, सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. किरकोळ वादातून आरोपींनी फिर्यादीचा मित्र अक्षय हजारे याला फोन करून फिर्यादीला मिलिंदनगर येथे बोलावून घेतले. फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दरम्यान, भोरे याने कशाच्या तरी साहाय्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
----------------


ओटीपी शेअर करणे पडले महागात

पिंपरी, ता. १४ : ओटीपी शेअर करणे एकाला चांगलेच महागात पडले. एकाची ऑनलाईनद्वारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला.

चेतन रवींद्र वाणी (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घरी असताना स्टेट बँक ऑफ मॉरिशसचे साल्ईस व्हिजा प्लॅटिनियम क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्याने त्यांनी मोबाईलमधील गुगलवरून स्टेट बँक ऑफ मॉरेशसचा नंबर सर्च केला. त्यावर फोन केला असता समोरील व्यक्तीने फिर्यादी यांना ओटीपी शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ३२ हजार ८५८ रुपयांनी आर्थिक फसवणूक केली.
----------------

मारुंजीत तरुणाला रॉडने मारहाण

पिंपरी, ता. १४ : किरकोळ कारणावरून तरुणाला रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार मारुंजी येथे घडला.

प्रवीण संदीपान माने (रा. पाचपीर चौक, काळेवाडी) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मदन बाळू गायकवाड (वय २७, रा. सम्राट चौक, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी काम करीत असलेल्या मदरसन कंपनी येथे आरोपीने फिर्यादीला बोलवले. ''तू एका तरुणीस माझ्याविषयी काय सांगितले व त्यावरून ती मला चारचौघात वाईट बोलली'' असे म्हणत फिर्यादीला आरोपीने रॉडने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत हातानेही मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले.
------------------

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांचा दोन ठिकाणी छापा

पिंपरी, ता. १४ : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या दोन ठिकाणी पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पथकासह गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छापा टाकला. हिंजवडी व वाकड येथील कारवाईत नऊ पिडीत महिलांची सुटका केली.

हिंजवडीतील कारवाईत स्पा मॅनेजर सोमनाथ बाबूराव इरबतनवार (वय ३१, रा. जलसा स्पा, कस्तुरी चौक, हिंजवडी, मूळ- लातूर), स्पा चालक सचिन रतन केदारी (वय २९, रा. वाकड) यांना अटक केली. तर रोहित मारुती दांडगडे (वय ४२, रा. वाकड, मूळ- लातूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी कस्तुरी चौकातील जलसा आयुर्वेदा स्पा येथे स्पा सेंटरच्या नावाखाली पाच महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवली. येथून पाच पिडीत महिलांची सुटका केली.


तर दुसरी कारवाई वाकड , कस्पटे वस्तीतील मानकर चौक येथील इज लाईन वेलनेस स्पा येथे करण्यात आली. येथून चार महिलांची पोलिसांनी वेश्याव्यवसायातून सुटका केली. येथील स्पा मॅनेजर महिलेला अटक केली. तर मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी), रवींद्र गायकवाड व महिला यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
यासह भोसरी, हिंजवडी,एमआयडीसी भोसरी, वाकड, दिघी या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार स्पा सेंटर व एक लॉज अशा एकूण पाच आस्थापना एक वर्षांसाठी सील करण्यात आल्या आहेत.
-----------------------

बनावट सिगारेट विकणाऱ्या दोघांवर गुन्हा

पिंपरी, ता. १४ : आयटीसी कंपनीच्या बनावट सिगारेट विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ९५ हजार ७०० रुपये किमतीचे सिगारेटचे पॅकेट जप्त केले आहेत. ही कारवाई काळेवाडी फाटा येथे करण्यात आली.

मोहनलाल गोमाजी भाटी (वय ५१, रा. संभाजीनगर, काळेवाडी फाटा, थेरगाव), गणेश सुवालाल गांधी (वय ३४, रा. पवारनगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आयटीसी कंपनीचे विक्री प्रतिनिधी अमोल चंद्रशेखर बहुलेकर (रा. विमाननगर, पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आयटीसी कंपनीचे उत्पादन असलेल्या सिगारेटच्या नावाने बनावट सिगारेट विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार काळेवाडी फाटा येथील मुकेश किराणा स्टोअर व गणेश ट्रेडिंग येथे छापा टाकला असता बनावट कॉपीराईट केलेल्या सिगारेटचा ९५ हजार ७०० रुपयांचा साठा आढळला.
-------------------------