
‘जित्राबां’ची उपासमार टाळण्यासाठी तहसीलदारांना हाक!
ऊर्से, ता. १४ : आजही शेळ्या, मेंढ्या, गुरे पाळून आपले पोट भरणारा समाज आपल्याकडे आहे. पावसाळ्यात ओसंडणाऱ्या जलधारा, चिखलमातीचा परिसर, डोंगरमाथ्यावर येणारा वेगळा रानगंध या सगळ्या गोष्टींना तर आपण निसर्ग म्हणतो. हिवाळा तर या सर्वांना पावसाळ्यातील उपासमारीचे हिरवागार बक्षीसच घेऊन आल्यासारखे वाटते. मात्र, उन्हाळा सर्वांनाच त्रासदायक ठरतो. कडाक्याचे ऊन आणि त्यात अन्नाच्या कणाकणासाठी होणारी शेळ्या, मेंढ्यांची होरपळ. त्यात शहरीकरणामुळे डोंगराचा भाग आधीच खाऊन टाकलेला असताना उरलेल्या भागाकडे जाण्यासाठी जेव्हा त्याची वाट रोखली जाते, त्यावेळी या आदिवासी-ठाकर समाजातील नागरिकांच्या मनातील तगमगीन त्यांचे अंतःकरण जाळून काढते. असाच प्रकार घडलाय उर्से येथील भागात.
रणरणत्या उन्हात तीव्रतेमुळे शेळ्या, मेंढ्या गवताच्या काढ्या खाऊन भूक भागवत असतात. मालकही आपली भूक पाळलेल्या जनावरांच्या जिवावर भागवत असतो. अशातच भर उन्हाळ्यात ऊर्से गावातील वाड्यावस्त्यावर मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या आदिवासी ठाकर समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेळ्या व गुरे चरण्यासाठी डोंगराभागाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. हा आदिवासी समाज लोकांचा पुर्वपरांपरागत शेळीपालन, गाई, गुरे, मोलमजुरी करून दैनंदिन उपजीविकेचा प्रश्न भागवितात. परंतु ऊर्से येथील द्रुतगती महामार्गावर मागील काही महिन्यांपासून रस्ते विकास महामंडळाकडून दोन्ही बाजूकडील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्याने या ठिकाणी मातीचा खच, दगडांचा खच पडला असल्याने येथील सेवा रस्ता बंद झाला आहे. येथील पुलाखालील रस्ताही बंद झाला आहे.
यामुळे दररोज शेळी, जनावरे चरण्यासाठी घेऊन जाण्याचा मार्ग बंद झाल्याने नाइलाजास्तव काही आदिवासी बांधवांनी आपली गुरे, शेळ्या व मेंढ्या आदी जनावरांची विक्री करावी लागली आहे. यामुळे वंशपरंपरागत असलेला व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. रस्ता बंद झाल्याने जनावरे द्रुतगती महामार्ग ओलांडून नेता येत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळास आदिवासी समाजाकडून निवेदन देण्यात आले आहे. आम्हाला जनावरे चरण्यासाठी लवकरात लवकर मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी आदिवासी समाजातील सुरेखा पवार, मंगल पवार, इंदूबाई पवार, योगेश शिंदे आदींनी मागणी केली आहे.
या आदिवासी बांधवांच्या मागणीवर किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष धामणकर, शांताराम कदम, अनंता कुडे, विश्वनाथ शेलार व कांचन धामणकर यांनी पाठिंबा देत रस्ता लवकरात लवकर करून द्यावा, यासाठी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
‘‘द्रुतगती महामार्गावरील कामामुळे आम्हाला डोंगरावर जनावरे चरावयास नेता येत नसल्याने जनावरे विकण्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही. तरी आम्हाला लवकरात लवकर रस्ता तयार करून द्यावा.’’
शांताबाई पवार, आदिवासी ठाकर महिला
- भाऊसाहेब चाटे, नायब तहसीलदार यांनी या ठिकाणी पाहणी करून आदिवासी समाज बांधवांना रस्ता करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.’’
- सुभाष धामणकर, अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा