
पुणे-जयपूर दरम्यान नियमित रेल्वे असावी
पिंपरी, ता. १५ ः राजस्थानमधील अनेक बांधव नोकरी-व्यावसायाच्या निमित्ताने पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यांची मुळगावी ये-जा सुरू असते. त्यांच्यासाठी पुणे-जयपूर-पुणे अशी रेल्वे सुविधा नियमित सुरू करून तिला चिंचवड स्टेशनला थांबा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, नोकरी-व्यवसायानिमित्त नियमितपणे राजस्थान-पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, तुलनेत सार्वजनिक प्रवासी सुविधा अत्यंत कमी आहे. सध्या पुणे-जयपूर-पुणे गाडी आठवड्यातून केवळ दोन वेळाच धावते. ती नियमित सुरू करण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी असून राजस्थानी बांधवांकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.