तुमच्या नवकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या नवकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवू
तुमच्या नवकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवू

तुमच्या नवकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवू

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः ‘‘शहरातील विविध घटकांसाठी पायाभूत सुविधा पुरवताना, विकास कामे करताना, विविध योजना राबवताना नवनवीन कल्पना, आयडिया महत्त्वाच्या ठरतात. ‘यिन’च्या माध्यमातून तुम्ही त्या मांडा, आम्ही त्या प्रत्यक्षात उतरवू. आपण सर्व मिळून शहराला एक नवीन व्हीजन देऊ,’’ अशा शब्दांत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्‍स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) पिंपरी-चिंचवड स्तरावरील अधिवेशन बुधवारी निगडीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी सभागृहात झाले. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी जांभळे पाटील बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी उपस्थित होते. अधिवेशनासाठी शहरातील ७६ महाविद्यालयांचे ‘यिन’ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
जांभळे पाटील म्हणाले, ‘‘शहर विकासाचे धोरण ठरवताना नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. नागरिकांनीही कामे, नवीन संकल्पना सूचवायच्या असतात. त्यांचा समावेश महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी केला जातो. त्यासाठी स्वतंत्र तरतूद केली जाते. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जाते. विविध घटकांच्या उन्नतीसाठी महापालिका प्रयत्न करत असते. अशा विविध योजना राबविण्यासाठी तुमच्या नवकल्पना महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यांवर निश्चितच कार्यवाही केली जाईल.’’ शहरातील दिव्यांग, महिला, गरीब विद्यार्थी, तृतीयपंथी अशा घटकांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात का?, त्यासाठी आपण काय उपाययोजना करीत आहोत?, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. त्यांचे निरसन करताना विविध घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती जांभळे पाटील यांनी दिली. सृष्टी सोनवणे व वैभवी देशमुख या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले.

‘सकाळ’चा ‘यिन’ उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यातून नवनवीन कल्पना घेऊन विद्यार्थी घडत आहेत. त्यांच्यातील नेतृत्वगुणांसह कलागुणांनाही व्यासपीठ मिळाले आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर समाज स्तरातील विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे.
- डॉ. प्रवीण चौधरी, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी

शहरातील महिला, दिव्यांग, तृतीयपंथी अशा विविध घटकांसाठी विविध योजना राबवीत आहोत. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत्तांसाठी भारत दर्शन उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचा सर्व खर्च महापालिका करणार आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका