
‘एचथ्रीएनटू’ संसर्गाचा शहरात पहिला बळी
पिंपरी, ता. १६ : राज्यात ‘एचथ्रीएनटू’च्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मुंबईहून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बैठक नियोजित केली आहे.
या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. वास्तविक, मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्त आमदार लांडगे मुंबईत आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एचथ्रीएनटू’चा पहिला बळी गेला आहे. ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा ‘एचथ्रीएनटू’ ने बाधित होऊन मृत्यू झाला. हे वृत्त समजल्यानंतर आमदार लांडगे तातडीने शहरात येण्यासाठी रवाना झाले. महापालिका आरोग्य, वैद्यकीय विभाग आणि रुग्णालय प्रमुखांसह संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये शहरातील‘एचथ्रीएनटू’ चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
काळजी घेण्याचे आवाहन...
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका ज्येष्ठ व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. संबंधित रुग्णाला सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या शून्य आहे, अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. मात्र, तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.