
समर्थ शिष्यवृत्ती परीक्षेचे बक्षीस वितरण उत्साहात
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १७ ः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, त्यादृष्टीने शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा यासाठी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच स्पर्धा परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळाली आहे. आगामी काळात याचे सोने करत जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून घ्या, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी खांडगे बोलत होते. तालुक्यातील सहा शाळांमध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये पूर्व परीक्षेत ७५३ विद्यार्थी प्रविष्ट होऊन, अंतिम परीक्षेसाठी १५५ पात्र झाले होते. यावेळी प्रथम क्रमांक जान्हवी मंगेश सोलकर, द्वितीय क्रमांक शुभम संताजी माळी, तृतीय क्रमांक शरण्या विष्णू हुळावळे, उत्तेजनार्थ- प्रथम- राधिका राजेश कामनवार, उत्तेजनार्थ द्वितीय तेजस दत्ता बैकर, शाळा निहाय प्रथम क्रमांक पायल सोमनाथ भुरुक, रचना पंडित हेलगंड, हर्षल सुनील चव्हाण यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सहप्रकल्प प्रमुख सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेश शाह, शंकर नारखेडे आदी उपस्थित होते. प्रभा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
सोनबा गोपाळे यांनी आभार मानले.
फोटोः ३१०२२