
पिंपरीत ‘एच३एन२’ने ज्येष्ठाचा मृत्यू महपालिका प्रशासन सतर्क; बरे झाल्याने तीन रुग्णांना घरी सोडले
पिंपरी, ता. १६ ः ‘एच३एन२’ संसर्गाचे शहरात चार रुग्ण आढळले असून, तिघांना उपचारानंतर घरी सोडले आहे. मात्र, भोसरीतील ७३ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका आरोग्य वैद्यकीय प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, वायसीएमसह महापालिकेच्या चार रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था केली आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्दी, खोकला, ताप असल्याने भोसरीतील ज्येष्ठ नागरिक महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सात मार्चला दाखल झाले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा ‘एच३एन२’ तपासणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यांना फुफ्फुस व हृदयाचाही आजार होता. त्यांच्यासह चार जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. उपचारानंतर बरे झाल्याने तिघांना घरी सोडले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.
महापालिका सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘‘एच३एन२’ संसर्ग झालेल्या रुग्णांवर महापालिकेचे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली आहे. प्रत्येक रुग्णालयात प्रत्येकी १० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत.’’
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी प्रशासक शेखर सिंह यांची गुरुवारी भेट घेऊन तर, आमदार अश्विनी जगताप यांनी फोनद्वारे संपर्क साधून उपाययोजना करण्याबाबत सूचना केली.
--