आयटीआय विद्यार्थ्यांना परदेशात संधी
पिंपरी, ता. १७ ः ‘‘जागतिक स्तरावरील कौशल्य, नोकरीच्या संधी व देशातील युवा मनुष्यबळ यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा,’’ असे आवाहन प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे ग्राड ड्रीम्स एज्युकेश कन्सल्टिंग प्रायमेट लिमिटेड इंडिया यांच्या ‘व्होकेशनल स्टडी ॲन्ड एम्प्लाईमेट अग्रॉड प्रोग्रॅम फॉर आयटीआय स्टुडन्टस्’ या अंतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यशाळेत सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, औद्योगिक शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शशिकांत पाटील, मेजर उदय जरांडे आदी उपस्थित होते. संधी ही प्रत्येकाचे दार ठोठावत असते. प्रत्येकाने त्या संधीचे सोने कशा प्रकारे करता येईल यावर विचार केला पाहिजे, असे अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी सांगितले. अत्यल्प शुल्कामध्ये प्रशिक्षण दिल्यामुळे चांगली नोकरी मिळून करियर झाल्याचे आयटीआयच्या माजी विद्यार्थ्यांनी नमूद केले. महापालिका गुणवत्ता पूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवून दर्जेदार प्रशिक्षण देऊन शहरातील बेरोजगारी कमी करण्यास मोठे पाऊल उचलत असल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले. तसेच जागतिकीकरण व उद्योग धंद्याच्या बदलत्या गरजांनुसार शहरातील आयटीआयमधील अभ्यासक्रम वाढविण्याची नितांत गरज असल्याचेही सांगितले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
विद्यार्थी-पालकांचे शंका निरसन
ग्राड ड्रीम्स एज्युकेश कन्सल्टिंग प्रायमेट लिमिटेड इंडियाच्या प्रिया वासुदेवन आणि तृप्ती नारकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. फक्त आयटीआयच का? पुढचं शिक्षण का नाही? पुढे शिक्षण काय? पुढचं शिक्षण घेण्यासाठी कुठल्या गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत, त्यासाठी वय किती पाहिजे?, कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात?, किती खर्च येणार?, कुठल्या प्रकारचे कर्ज घेऊ शकतात? अशा शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी अर्थसेतु मदत करेल. जर्मनी, जपान आणि युरोप सारख्या देशात जाऊन तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता, त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू असेही प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.