
कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी माणमध्ये विविध उपक्रम
पिंपरी, ता. १७ ः जय शिवराय प्रतिष्ठान संचालित माण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या सहकार्यातून दोन दिवस विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. या शाळेत वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर, शेतमजूर, सुरक्षारक्षक, मोलकरीन, घरकाम कामगार, आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले.
ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा कुंभार, डॉर्बिट फाउंडेशनच्या संस्थापिका इम्पा श्रीवास्तव, विजया श्रीवास्तव, कीर्तनकार अशोकमहाराज गोरे, नारायण कुंभार, मुख्याध्यापक अंबादास रोडे यांनी ऐतिहासिक ते आधुनिक काळातील कर्तृत्ववान महिलांच्या देदीप्यमान कार्याची कविता, आख्यान, व्याख्यान या माध्यमातून प्रबोधनपर माहिती दिली. फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक शरणकुमार खंडू व प्रकल्पप्रमुख संतोष गोंधळेकर यांनी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पिरंगुट येथील टूजी बायोसीएनजी प्लान्टला क्षेत्रभेट आयोजित केली होती. शेतातील टाकाऊ घटकांवर प्रक्रिया करून सीएनजी वायूची निर्मिती कशी केली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले. मॅजिक बस इंडियाच्या लेखाविभागप्रमुख तृप्ती पायगुडे उपस्थित होत्या. श्वेता मुंडे आणि संदीप पाटोळे यांनी संयोजन केले. शीतल टकले यांनी आभार मानले.
--