उर्से टोलनाका अपघात

उर्से टोलनाका अपघात

जावई- सासऱ्यासह चालक ठार

उर्से टोलनाक्यानजीक अपघात; गोंदवलेकर महाराजांच्या वंशजाचा मृतात समावेश

सोमाटणे, ता. १७ ः द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यानजीक झालेल्या अपघातात मोटारीतील जावई-सासऱ्यासह चालक जागीच ठार झाला. आज सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला. राहुल बाळकृष्ण कुलकर्णी (वय ४२, रा. गोंदवले, जि. सातारा) विजय विश्वनाथ खैर (वय ७२, रा. रत्नशील अपार्टमेंट कऱ्हाड, जि. सातारा) व हेमंत राऊत (वय ३९, रा. मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. राहुल कुलकर्णी हे गोंदवलेकर महाराजांचे सातवे वंशज, तर सासरे हे महाराष्ट्र बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी होते.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय खैर हे जावई राहुल कुलकर्णी यांना भेटण्यासाठी काल मुंबईला गेले होते. त्यांची भेट घेतल्यानंतर आज पहाटे राहुल कुलकर्णी हे पुणे येथे कंपनीच्या कामासाठी सासरे विजय खैर व चालक हेमंत राऊत यांच्यासह मोटारीमधून (एमएच ०४ जेएम- ५३४९) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने पुण्याकडे येत होते. उर्से टोलनाक्यानजीक आढे गावच्या हद्दीत आज सकाळी सव्वासातच्या सुमारास वाहनास ओव्हरटेक करत असताना चालकाला अचानक रस्त्याच्या कडेला उभा असलेला कंटेनर दिसला. चालकाने वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्नही केला; परंतु मोटारीचा वेग जास्त असल्याने त्याचे नियंत्रण सुटले व मोटार कंटेनरवर जोरात आदळून खाली घुसली. हा अपघात इतका भीषण होता, की मोटारीतील विजय खैर, राहुल कुलकर्णी व चालक हेमंत राऊत जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, देवदूत यंत्रणा, रुग्णवाहिका घटनास्थळी पोचली. त्यांनी तातडीने तिघांना बाहेर काढले; परंतु त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता.
या अपघातात मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला. मोटारीचा पत्रा कटरने कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. शिरगाव पोलिसांनी वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली व ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास फौजदार सुरेश कांबळे करीत आहेत.

तीन महिन्यांत चार अपघात
------------------------
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नंबरची लेन ही फक्त अपघातग्रस्त व नादुरुस्त वाहन उभे करण्यासाठी आहे. अन्य कारणासाठी या लेनवर वाहन उभे केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तीन महिन्यांपासून अपघाताला आळा घालण्यासाठी आरटीओ व महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे वाहनचालक, रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत चार अपघात झाले असून, एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

गोंदवलेत शोककळा
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे वंशज असलेले राहुल कुलकर्णी हे ठाणे येथे एक खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. पुण्यातील काम उरकून ते आई वडिलांना भेटण्यासाठी गावी गोंदवल्याला येणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. राहुल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
या अपघातात राहुल व विजय खैर या जावई व सासरे यांचा जागीच मृत्यू झाल्याने राहुलच्या पत्नी स्नेहल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघाताची माहिती समजताच गोंदवल्यातील वातावरण सुन्न झाले होते, तर ‘माझे बाबा कुठं आहेत?’ अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या राहुलच्या मुलीच्या प्रश्नाने उपस्थित गहिवरून गेले होते.’

फोटोः ३१११७ ः मोटारीचा फोटो
31287 ः राहुल कुलकर्णी
31288 ः विजय खैर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com