
पालिका कर्मचारी कामावर; पुरवठा, तहसीलचे संपावर
पिंपरी, ता. १७ ः जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा शुक्रवारी (ता. १७) चौथा दिवस होता. त्यात महापालिका कर्मचारीही सक्रीय सहभागी झाले आहेत. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी काळ्या फिती लावून ते दोन दिवसांपासून कामावर हजर झाले आहेत. दरम्यान, तहसील व अन्नधान्य पुरवठा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले आहे.
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षण-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १४) संप पुकारला आहे. त्यात महापालिका कर्मचारी दोन दिवस सक्रीय सहभागी झाले होते. मात्र, गुरुवारपासून काळ्या फिती लावून पूर्ण क्षेमतेने ते कामावर हजर झाले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांचे पत्र
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महापालिका- नगरपालिका- नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनच्या माध्यमातून महापालिका कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्याबाबत राज्य फेडरेशनचे व महापालिका कर्मचारी महासंघचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. तसेच, ‘आपले निवेदन प्राप्त झाले असून त्यातील मुद्द्यांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर बैठक आयोजित करण्यात येईल,’ असे लेखी पत्र दिले आहे. त्यानंतर झिंजुर्डे यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि काळ्या फिती लावून कामावर हजर राहायचे व संपास पाठिंबा द्यायचा, असा निर्णय घेतल्याचे कळविले आहे.
‘‘संपात सहभागी झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईबाबत नोटीस दिली होती. त्यानंतर आमचे सर्व सात हजार बारा कर्मचारी कालपासूनच आपापल्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह महापालिकेचे सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.’’
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, प्रशासन विभाग, महापालिका
नायब तहसीलदार नियुक्त
निगडीतील पिंपरी-चिंचवड अतिरिक्त तहसील कार्यालयातील ३५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांनी संपूर्ण काम बंद ठेवले आहे. याबाबत अतिरिक्त तहसीलदार गीता गायकवाड म्हणाल्या, ‘‘आमचे ३५ कर्मचारी संपावर आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय झालेली नाही. कंत्राटी तत्त्वावर चार शिपाई आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकांकडील टपाल स्विकारून कार्यवाही सुरू आहे. परिमंडल स्थरावर नायब तहसीलदारांच्या माध्यमातून नागरिकांना विविध दाखले व नागरी सेवा दिली जात आहे.
पुरवठा कार्यालय बंदच
अन्नधान्य पुरवठा विभागाचे दोन कार्यालये शहरात आहेत. त्यातील एक निगडीत असून, दुसरे भोसरीत आहे. तेथील कर्मचारी अद्यापही संपात सक्रीय सहभागी झाले आहेत. मात्र, निगडीतील पुरवठा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संप व कामकाज बंद असल्याबाबत सूचना लावली आहे. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप असल्याने कार्यालयील कामकाज बंद राहील. कृपया नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सूचनेच्या माध्यमातून केले आहे.