भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु जगताप, खाडे, पवार, पटवर्धन, काटे, फुगे यांची नावे चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु 
जगताप, खाडे, पवार, पटवर्धन, काटे, फुगे यांची नावे चर्चेत
भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु जगताप, खाडे, पवार, पटवर्धन, काटे, फुगे यांची नावे चर्चेत

भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु जगताप, खाडे, पवार, पटवर्धन, काटे, फुगे यांची नावे चर्चेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाचा आमदार महेश लांडगे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सुमारे ६ महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे आता शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली पक्षांतर्गत सुरु झाल्याची जोरदार चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना बदलतात की महापालिका निवडणुका होईपर्यंत वर्षभराची मुदतवाढ देतात, याचीही चर्चा पक्ष पातळीवर सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाचा बदल करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश पातळीवरुन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भाजप प्रदेशाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे शहराध्यक्ष बदलल्यास दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन व महेश लांडगे यांचे निकटवर्तीय शहर सरचिटणीस विजय फुगे आदींची नावे चर्चेत आहेत.
शहर भाजपमध्ये नवनिर्वाचित आमदार अश्‍विनी जगताप यांचा, शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे व निष्ठावंतांचा असे तीन गट आहेत. यामध्येही काही निष्ठावंत जगताप व काही लांडगे गटाच्या बाजूने आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप चिंचवडच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीसाठी इच्छूक होते. परंतु पक्षाने अश्‍विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रचारप्रमुख म्हणून इमानेइतबारे काम केले. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे.
निष्ठावंतांपैकी खाडे, पवार हे माजी शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे खाडे, पवार, पटवर्धन अनुभवी असल्याने त्यांचीही नावे पुढे आली आहेत. तर; लांडगे यांना बदलल्यास लांडगे गटाच्यावतीने फुगे यांचेही नाव पुढे येवू शकते, अशी शक्यता भाजप वर्तुळात वर्तवली जात आहे. तसेच; जगताप यांच्या कुटुंबात दोन पदे देण्याचा मुद्दा पुढे आल्यास जगताप गटाकडून काटे यांचे नाव पुढे येऊ शकते.