
‘एच३एन२’चा एकही रुग्ण नाही
पिंपरी, ता. १७ ः इन्फ्लूएंझा अर्थात ‘एच३एन२’ संसर्ग झालेला एकही सक्रिय रुग्ण सद्यःस्थितीत शहरात नाही. बरे झालेले तीन रुग्ण जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दाखल झाले होते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे महापालिका आरोग्य वैद्यकीय प्रशासनाने शुक्रवारी (ता. १७) स्पष्ट केले. दरम्यान, एच३एन२ रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने पाच रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून प्रत्येकी दहा याप्रमाणे पन्नास खाटांची व्यवस्था केली आहे.
शहरात ‘एच३एन२’ संसर्गाचे जानेवारीपासून आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. त्यातील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तिघांवर उपचार करून घरी सोडले आहे. मात्र, सात मार्च रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या भोसरीतील ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना फुफ्फुस व ह्रदयाचाही त्रास होता. त्यांचा एच३एन२ तपासणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
उपचाराची सुविधा
‘एच३एन२’ संसर्ग झालेल्या रुग्णांवर महापालिकेने नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी व संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचाराची व्यवस्था केली आहे. प्रत्येक रुग्णालयात प्रत्येकी १० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत.
लक्षणे
ताप, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, धाप लागणे, डोकेदुखी, नाक गळणे
अधिक धोका
गर्भवती, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, प्रतिकारशक्ती कमी असलेले, अन्य आजार
प्रतिबंधात्मक उपाय
- साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवा
- पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या
- लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्या खा
- धूम्रपान टाळा, पुरेशी झोप व विश्रांती घ्या
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, मास्क वापरा
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या
- हस्तांदोलन व गर्दीची ठिकाणे टाळा
- विलगीकरणात रहा, मीठ-हळद पाण्याने गुळण्या करा