
‘डॉ. पी. डी. पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते जाहीर
पिंपरी, ता. १७ : राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ. पी. डी. पाटील नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट थेसिस इन फार्मास्युटिकल सायन्सेस’ स्पर्धेतील विजेत्यांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयातर्फे स्पर्धा घेण्यात आली.
फार्मसीमधील पदव्युत्तर पदवी संशोधक विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हाती घ्यावेत, त्यावर संशोधन करावे आणि त्यांना प्रोत्साहन देणे व त्यांचे संशोधन समाजासमोर आणून गौरविण्यासाठी पुरस्कार दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतातील मान्यताप्राप्त संस्थांमधून पदव्युत्तर पदवी (एम. फार्म अथवा एम.एस-फार्मास्युटिकल सायन्सेस) घेतलेल्या संशोधन विद्यार्थ्यांमधून विविध विभागांतर्गत घेतलेल्या स्पर्धेच्या मूल्यमापनानुसार पुरस्कार जाहीर केले आहेत.
देशभरातील संशोधक विद्यार्थ्यांकडून प्रत्येक श्रेणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यात आला होता. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, नामवंत संशोधक आणि उद्योग तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्या पॅनेलने चार फेऱ्यांमध्ये थीसिसचे मूल्यमापन केले. जसे की तांत्रिक उत्कृष्टता, उद्देश, स्टडी डिझाइन, निष्कर्ष, विषयाची स्पष्टता आणि विद्यार्थ्याने केलेल्या संशोधनाचे, संशोधन समुदयासाठीचे महत्त्व, यासोबत समाज व सार्वजनिक आरोग्याबाबतीत होणारे सकारात्मक परिणाम या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. तसेच संशोधनातील मूळचे तत्वज्ञान, कल्पकता, आयपीआरचे महत्त्व, प्राप्त झालेला संशोधन निधी आणि संशोधनाची व्यावसायिक उपयुक्तता सुद्धा तपासण्यात आली.
यांना मिळाले पुरस्कार ः फार्मास्युटिकल केमिस्ट्री ः आसमा पठाण (आर.सी.पटेल आयपीआर, शिरपूर), शंकर घार्गे (केएलई कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावी) व पूजा पवार (डीपीयू फार्मसी, पुणे). फार्मास्युटिक्स ः गौरव पाटील, दिनेश बोऱ्हाडे (दोघेही एच.आर.पटेल आयपीईआर, शिरपूर) व पूजा गिरडकर (वाय.बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालय, औरंगाबाद). फार्माकोलॉजी ः भाव्या दवे (महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा), प्रियांका तिवारी (नाईपर, रायबरेली) व भानिता सौद (फार्मास्युटिकल सायन्स कॉलेज, दयानंद सागर विद्यापीठ). नॅचरल प्रॉडक्ट ः गौरव सूर्यवंशी (एच.आर.पटेल आयपीईआर, शिरपूर), स्लाविका ग्रेशियस (गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, गोवा) व नमिता सुर्वे (डीपीयू फार्मसी, पुणे). पुरस्कार प्रदान सोहळा संस्थेत एप्रिलमध्ये होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे यांनी दिली.