
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यव्यापी सभासद नोंदणी सुरू
पिंपरी, ता. १८ : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सामील होऊन अंनिसचे सभासद व्हावे, असे आवाहन अंनिसच्या कार्यकर्त्या शुभांगी घनवट यांनी केले आहे.
अंनिस संघटनेची भूमिका सांगताना अंनिसचे कार्यकर्ते विश्वास पेंडसे म्हणाले, ‘‘अंनिस ही महाराष्ट्रातील संत समाजसुधारक यांचा धर्मचिकित्साचा वारसा पुढे चालवते. व्यक्तीच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून समाज विवेकी बनवणे हे अंनिसचे अंतिम ध्येय आहे. अंनिसचा कोणत्याही देवा धर्माला विरोध नसून देवा धर्माच्या नावावर मानसिक, आर्थिक शोषण करणाऱ्या कुप्रवृत्तीला विरोध आहे. अंनिसमध्ये काम करण्यासाठी कोणत्याही जाती धर्माची, आस्तिक नास्तिक अशी कोणतीही अट नाही. भारतीय संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक जण सहभागी होऊ शकतो.
या अंनिस सभासद नोंदणी अभियानांतर्गत मार्च, एप्रिल आणि मे २०२३ या तीन महिन्यात राज्यभरात अंनिसचे पाच हजार सभासदांची नोंदणी केली जाणार आहे. ज्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अंनिसच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क करा. छापील सभासद नोंदणी फॉर्म भरून अंनिसचे सभासद व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.