
वाढदिवसाच्या नावाखाली कुप्रसिद्धीचे शक्तिप्रदर्शन
मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ : प्रतिस्पर्धी टोळ्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासह दहशत माजविण्यासाठी गुंडांकडून वाढदिवसाच्या नावाखाली शक्तिप्रदर्शन केले जाते. गुन्हेगारीचे स्तोम माजवीत अशाप्रकारे कुप्रसिद्धी मिळविण्याचे प्रकार वाढत आहेत.
गुंडांसह त्याच्या टोळ्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण ‘ॲक्टिव्ह’ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. यामध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे निमित्त त्यांना मिळते. आपल्या मागे किती जण आहेत, आपली अजूनही दहशत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न गुंडांकडून केला जात आहे. मोठे कार्यक्रम आयोजित करून ताकत दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. तेथे उभारलेले फ्लेक्स अथवा सोशल मीडियावरील पोस्टवर गुंडगिरीचे उदात्तीकरण करणारा मजकूरही पाहायला मिळतो. यातून एकप्रकारे दहशत निर्माण केली जात असल्याचे दिसून येते. शहरात असे प्रकार घडत असतात.
बॅनरबाजी अन सेलिब्रेशन
भला मोठा केक, मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी, मोठी रॅली, असे जंगी सेलिब्रेशन केले जाते. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. गुंडाचा, हत्यारांचा फोटो व त्यावर ''भाई का बर्थ डे'' यासह विविध मजकुराचे बॅनर उभारले जातात. ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते.
विविध ठाण्यात गुन्हे दाखल
सोशल मीडियावर हत्याराचे प्रदर्शन करून दहशत माजविणाऱ्या ५३ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये २५ गुन्हे दाखल झाले आहेत. यासह इतर पोलिस ठाण्याच्या पथकानेही कारवाई केल्या आहेत.
काही घटना
- विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नीलेश गायवळ या सराईत गुंडाच्या वाढदिवसाचे अनधिकृत फ्लेक्स चांदणी चौकात झळकले. या फ्लेक्सवर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली.
- काही दिवसांपूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख युनूस खान (रा. काळाखडक, वाकड) याचाही काळाखडक येथे जंगी वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमाला वाकड पोलिसांनी परवानगी नाकारून प्रतिबंधात्मक नोटीसही बजावली असतानाही त्याने तीनशे ते चारशे तरुणांना गोळा करून वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात पोलिस रेकॉर्डवरील बरेचसे गुन्हेगार हजर होते. यातील आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली.
- सोशल मीडियावर हत्यारांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचे प्रकारही घडत असतात.
गुंडा विरोधी पथकाची कारवाई
- पकडलेले आरोपी ः ५३
- दाखल गुन्हे ः २५
जप्त हत्यार
- पिस्तूल ः १७
- कोयते ः २७
- तलवार ः ७
- काडतूस - २७
‘‘गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सोशल मीडियावरही लक्ष असते. गुन्हेगारांचे उदात्तीकरण होईल, असे काही आढळल्यास तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल केले जात आहेत.’’
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा