
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका
पिंपरी, ता. १८ ः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तब्बल हजारो शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी मंगळवार (ता. १४) पासून संपावर गेले आहेत. या संपाचा आज पाचवा दिवस आहे. या संपाचा सर्वाधिक फटका दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, शिधापत्रिका कार्यालयाला बसला असून, संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हाल होत आहेत.
जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी महापालिका, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, शिधापत्रिका कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग पाचव्या दिवशी शनिवारी (ता. १८) सुरूच होता. शहरात सहा दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या सहाही कार्यालयात मिळून फक्त १२ कर्मचारी संपावर आहे. त्यामुळे रजिस्टर नोंदणी, घर खरेदी अशा प्रकारे काही प्रमाणात कामकाजावर परिणाम झाला आहे. शहरातील ‘अ’ आणि ‘ज’ शिधापत्रिका कार्यालयात सात अधिकारी, कर्मचारी सेवेत आहेत. अधिकारी वगळता सगळे कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे विविध कामे नागरिकांची खोळंबली आहेत. शनिवारी हा सुटीचा दिवस होता. कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महापालिकेतील सर्व दालने बंद होती. त्यामुळे महापालिकेसह शहरातील इतर शासकीय कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. संपामुळे कामकाज ठप्प होते.