मूळ कर भरा; 
शास्ती माफी मिळवा

मूळ कर भरा; शास्ती माफी मिळवा

पिंपरी, ता. १९ ः अवैध बांधकामांचा शास्ती (दंड) सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्यासाठी मिळकतकराची मूळ रक्कम भरावी लागणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, चिखली करसंकलन कार्यालय क्षेत्रातील सर्वाधिक एक हजार ६११ मिळकतधारकांनी १२ कोटी २२ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मूळकर भरला आहे. रविवारपर्यंत (ता. १९) शहरातील आठ हजार २१७ मिळकतधारकांनी शास्ती माफीचा लाभ घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत मिळकतकराची मूळ रक्कम भरणाऱ्यांना शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे.
महापालिकेची परवानगी न घेता बांधलेली शहरातील बांधकामे अनधिकृत आहेत. त्यात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मिश्र स्वरुपातील बांधकामांचा समावेश आहे. अशा बांधकांमाना २०१४ पासून शास्ती लावलेला होता. बांधकाम वापर, बांधकाम प्रकार आणि बांधकाम क्षेत्रानुसार त्यावरील आकारलेल्या शास्तीचे स्वरूप वेगवेगळे आहे. ती रक्कम साधारण मिळकतकराच्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मूळकरापेक्षा शास्तीची रक्कम अधिक दिसते. शास्ती माफीची होणारी मागणी आणि शास्तीमुळेवाढत जाणारी थकबाकीची रक्कम यामुळे मूळकराचा भरणाही मिळकतधारक करत नव्हते. परिणामी मूळकर व शास्तीच्या थकबाकीची रक्कम वाढत गेली. अखेर तीन मार्च रोजी राज्य सरकारने सरसकट शास्ती माफीची निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी मूळकराची पूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे.

कर भरणासाठी अवघे १२ दिवस
महापालिकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. रविवारपर्यंत सातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कर वसूल झाला आहे. ३१ मार्चपर्यंत कर भरता येणार आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने उपक्रम राबविले आहेत. प्रसंगी मालमत्ता जप्ती, त्याचा लिलाव, माध्यमांद्वारे थकबाकीरांच्या नावांची प्रसिद्धी, ऑनलाइन सुविधा, विविध सवलत योजना राबविल्या आहेत.

करसंकलन उपाययोजना
- झिरो टॉलरन्स पॉलिसीत १३ हजार अधिपत्रे
- बाराशेपेक्षा अधिक मालमत्ता जप्त, एप्रिलपासून लिलाव
- सार्वजनिक सुटीच्या दिवशी करसंकलन कार्यालये सुरू
- ऑनलाइन करभरणा सुविधा व कर संवाद उपक्रम
- महापालिका सारथी हेल्पलाइन २४ बाय ७ मदत कक्ष
- प्रत्येक मालमत्तेला मालमत्ताधारकाचा मोबाईल क्रमांक लिंक
- प्रामाणिक करदात्यास करात विशेष सवलत
- जप्ती, नळजोड खंडित, थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध
- साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सर्व १७ करसंकलन कार्यालये सुरू

शास्ती माफ मिळकती
शास्ती माफ झालेल्या ः ८,२१७
प्रमाणपत्र मिळालेल्या ः २,०२३
मूळकर भरणा रक्कम ः ५६,९५,०१,३४१
माफ झालेली शास्ती ः १५२,८४,३५,३२८

शास्ती माफ लाभाची प्रतिक्षा
एकूण मिळकती १७,०००
मिळकतींचा मूळकर ः २३९ कोटी
मिळकतींचा शास्ती ः ३२५ कोटी


मिळकतकर व थकबाकीची रक्कम स्वीकारण्यासाठी पिंपरीतील मुख्य कार्यालयासह सर्व विभागीय करसंकलन कार्यालये सार्वजनिक सुटीच्या दिवशीही खुली राहणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी सहा अशी कार्यालयांची वेळ आहे. ऑनलाइन करभरणा सुविधाही उपलब्ध आहे. शास्ती माफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च रोजी रात्री बारापर्यंत मूळकराची रक्कम मिळकतधारकांना भरता येणार आहे.
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com