
गुन्हे वृत्त
उघड्या दरवाजावाटे दोन लॅपटॉप चोरीला
उघड्या दरवाजावाटे दोन लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना नवी सांगवी येथे घडली. दत्ता माधवराव जाधव (रा. कीर्तीनगर गल्ली नंबर दोन, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना ५५ हजार रुपये किमतीचे सोन लॅपटॉप चोरट्याने चोरले.
जागेत बेकायदा प्रवेश करून नुकसान
पिंपरी : जागेत बेकायदा प्रवेश करून नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मारुंजीगाव येथे घडला.
किरण प्रकाश बुचडे (रा. मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान सिंग चित्तोडिया, त्याची पत्नी,भाऊ व इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या जागेत बेकायदा प्रवेश केला. फिर्यादीस शिवीगाळ करून गॅस कटर व बुल्डोजरच्या साहाय्याने फिर्यादीच्या जागेला असलेले सिमेंट खांब व तारेचे कुंपण तोडून नुकसान केले. व त्यांच्या नावाचा फलक व कुंपणाच्या तारा काढून भगवानसिंग चित्तोडिया या नावाचा फलक लावला आहे.
पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली
पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना पिंपळे निलख येथे घडली. ५४ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या गणेशनगर येथील रस्त्याने घरी जात होत्या. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. फिर्यादीच्या गळ्यातील ८७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून आरोपी पसार झाले.
एकाला कोयत्याने मारहाण
जुन्या भांडणाच्या रागातून एकाला कोयत्याने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार भोसरी येथे घडला. सीताराम नागोराव पवार (रा. एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाळू पवार (वय ३०, रा. वाकड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांची पत्नी, भाऊ व परिसरातील लोक त्यांच्यासोबत झोपडीबाहेर बोलत उभे असताना फिर्यादीचा भाचे जावई असलेला आरोपी तेथे आला. फिर्यादीचे भाऊ शंकर पवार यांच्या सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला कोयत्याने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मोबाइलचेही नुकसान केले.