
तहानलेल्या चिमण्यांसाठी पाणवठा
पिंपळे गुरव, ता. १९ ः उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीयं तर मग पक्ष्यांचे काय होत असेल!, या विचारातूनच तहानलेल्या पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी आता पक्षीप्रेमी पुढाकार घेऊ लागलेत. गजबजलेल्या सिमेंटच्या जंगलात दाराबाहेर, खिडकीत, अंगणात पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे (वॉटर फिडर)
पहायाला मिळत आहेत.
चिमण्यांच्या चिवचिवटाने दिवस सुरू होत होता, पण तो चिवचिवाट आता दिसत नाही. तो आवाज ती किलबिलाट पुन्हा ऐकू यावी व चिमण्या बद्दलचे प्रेम वाढावे म्हणून दरवर्षी २० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा करण्यात येतो. चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी आपल्या घराच्या समोर, बाल्कनीत जिथे शक्य असेल तिथे, लहानसे घरटे लटकवून द्या. ते तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकतही घेऊ शकता. त्या घरट्याजवळ लहानशा ताटलीत दररोज धान्य व पाणी ठेवत जा. काही दिवसात तिथे चिमण्यांची झुंबड उडालेली तुम्हाला दिसेल. या संकल्पनेतून ‘एक पाण्याचे भांडे चिऊसाठी’ हा उपक्रम पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड राबवत आहेत. त्यांनी घराच्या पुढे, जिन्यात, लोखंडी ग्रीलला कृत्रिम पाणवठे (कुंडी) लटकवले आहेत. काहींमध्ये धान्य टाकून पक्ष्यांच्या अन्नाचीही सोय केली आहे.
--
--