गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

जुन्या भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना पिंपरी येथे घडली. विशाल मनोज लोट (रा. पिंपरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलमान शेख (वय ३०, रा. पिंपरी) याला अटक केली आहे. फिर्यादी हे भाजी मंडईतील शेतकरी कट्टा येथे पायी फिरत असताना आरोपी तेथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून धमकी देत त्यांच्यावर कोयत्याने वार केला. फिर्यादी यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडवून ‘आज याला जिवंत नाही सोडणार’ असे म्हणत पुन्हा कोयत्याने वार केले. हातानेही मारहाण केली.
----------------------
बसच्या काचा फोडून चालकासह वाहकाला मारहाण
पीएमपीएमएल बससह एक मोटार रस्त्यात अडवून काचा फोडल्या. तसेच बस चालकासह वाहकाला मारहाण करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार बावधन येथे घडला. पीएमपी बसचे चालक योगेश बोरसे (रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामा रेड्डी मेघावत (वय २४,) पवन मगर (वय २२, दोघेही रा. संजय गांधी वसाहत, पाषाण) व अजय राठोड (वय २२, रा. कुलाबा, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे बस घेऊन जात असताना आरोपींनी बावधन येथील ओंकार गार्डन चौक येथे सेवा रस्त्यावर ही बस अडवली. त्यानंतर बससह आणखी एका मोटारीची काच दगडाने फोडून नुकसान केले. फिर्यादी बसचालकासह वाहकाला हाताने मारहाण करीत त्यांना जखमी करून शिवीगाळ व धमकी दिली. यामध्ये प्रवाशांचीही सुरक्षितता धोक्यात आणली.
-----------------------------
घरफोडीत सत्तर हजाराचा ऐवज लंपास
दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने सत्तर हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना चिंचवड येथे घडली. मल्लिकार्जुन भंगे (चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घरात शिरलेल्या चोरट्याने हॉलमधील कपाटाचे कुलूप तोडून पन्नास हजारांचे सोने-चांदीचे दागिने व वीस हजारांची रोकड असा एकूण सत्तर हजारांचा ऐवज लंपास केला.
-------------------
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणारा अटकेत
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. असद खान (वय ६५, रा. म्हाडा टॉवर्स, पिंपरी, मूळ- नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी उद्यानाच्या बाहेर बाकावर बसलेली असताना आरोपी तिच्याजवळ फिरत होता. त्याने मुलीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलगी मामाच्या घरी खेळण्यासाठी आली असता आरोपी तिचा पाठलाग करीत होता.
-----------------
रिक्षाचालकाच्या खून प्रकरणी एकाला अटक
दापोडीतील रिक्षाचालकाच्या खून प्रकरणी अमित कांबळे (वय २६, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
अली शेख (वय ४२, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शेख हे गणेश गार्डन फेज तीन येथील त्यांची रिक्षा घेण्यासाठी आले असता रिक्षात आरोपी हा त्याच्या मैत्रिणीसोबत अश्लील चाळे करीत होता. दरम्यान, शेख यांनी आरोपीला हटकल्याने आरोपीने त्यांना वीट व सिमेंटच्या तुकड्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी कांबळे याला अटक केली.