
आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पिंपरी, ता. २० ः चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा बारावा वर्धापनदिन तीन उत्साहात झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, उपाध्यक्ष अशोक नागणे, कार्याध्यक्ष प्रिया जोशी उपस्थिती होते.
ज्येष्ठ व्याख्याते प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे यांचे ‘आनंदाने जगू या!’ विषयावर व्याख्यान झाले. ‘‘जीवनातील लहानमोठ्या घटनांमधून आनंद घेण्याची वृत्ती अंगी बाळगणे हेच आनंदी होण्याचे खरे सूत्र आहे,’’ असा कानमंत्र त्यांनी दिला. प्रासंगिक विनोद अन् आनंदाचे क्षण कथन करून त्यांनी श्रोत्यांना हसतखेळत ठेवले. प्रा. श्याम भुर्के यांचे ‘विनोदावर बोलू काही’ विषयावर व्याख्यान झाले. विनोदी साहित्यिकांच्या गोष्टी सांगून त्यांनी श्रोत्यांना खळखळून हसवले. संघाच्या सभासदांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत विविध कलांचे सादरीकरण केले. प्रेमलता कलाल व सहकाऱ्यांनी सकस अन्नाचे भारूड, उमा पाडुळकर व सहकाऱ्यांनी ‘मराठी असे आमुची मायबोली’ हे लघुनाटक, पूनम गुजर यांचे नृत्य झाले. नृसिंह पाडुळकर, प्रिया जोशी, वंदना बोरकर, कविता कोल्हापुरे, ज्ञानेश्वर खेडकर, किरण गंगापूरकर आदींनी अनुभव कथन केले. खजिनदार रवींद्र झेंडे यांनी उत्कंठावर्धक कथा सांगितली. सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. अश्विनी कोटस्थाने यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप वळसंगकर यांनी आभार मानले.