एप्रिलपासून प्रभावीपणे ‘पे ॲंड पार्क’? पार्किंग पॉलिसी अंमलबजावणी ः पालिका व पोलिस प्रशासनात प्राथमिक चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एप्रिलपासून प्रभावीपणे ‘पे ॲंड पार्क’?
पार्किंग पॉलिसी अंमलबजावणी ः पालिका व पोलिस प्रशासनात प्राथमिक चर्चा
एप्रिलपासून प्रभावीपणे ‘पे ॲंड पार्क’? पार्किंग पॉलिसी अंमलबजावणी ः पालिका व पोलिस प्रशासनात प्राथमिक चर्चा

एप्रिलपासून प्रभावीपणे ‘पे ॲंड पार्क’? पार्किंग पॉलिसी अंमलबजावणी ः पालिका व पोलिस प्रशासनात प्राथमिक चर्चा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी व रस्त्यांवरील कोंडीतून शहराची सुटका व्हावी, यासाठी महापालिकेने ‘पार्किंग पॉलिसी’ अंतर्गत ‘पे ॲंड पार्क’ योजना दीड वर्षांपूर्वी सुरू केली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी ती बारगळली असून, अनेक ठिकाणी केवळ ‘पे ॲंड पार्क’चे फलक उभे आहेत. आता नव्या स्वरूपात व प्रभावीपणे ‘पार्किंग पॉलिसी’ आणण्याची तयारी महापालिका व पोलिस प्रशासन करत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी दरम्यान एप्रिलपासून अंमलबजावणीची तयारी प्रशासन करत आहे.
शहरात एक जुलै २०२१ पासून ‘पे ॲंड पार्क’ योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. वाहनांच्या प्रकारानुसार प्रतितास शुल्क आकारणी केली जात होती. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली होती. शहरातील १३ प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलाखाली अशी एकूण ४५० ‘पे ऍण्ड पार्क’चे ठिकाणे निश्चित केली होती. सद्यःस्थितीत ‘पे ॲंड पार्क’ कार्यवाही होत नसली तरी ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही अनेक ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. अशा वाहनचालकांना शिस्त लागावी व कोंडीतून सुटका होण्यासाठी ‘पे ॲंड पार्क’ योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यास महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्यासह महापालिका व पोलिस अधिकारी उपस्थित होते. नियुक्त एजन्सीकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण करण्यात आले.

‘पार्किंग’बाबत चर्चेतील मुद्दे
- रस्त्यावरील ‘पार्किंग’मुळे होणारा अडथळा
- योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘मॉडेल्स’
- ‘पे ॲंड पार्क’चे शुल्क ठरवणे
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे
- पार्किंग शुल्क भरण्यासाठी डिजिटल सुविधा
- पार्किंगबाबत स्वतंत्र ॲप विकसित करणे

पॉलिसी बारगळण्याची कारणे
- वाहनचालकांसह काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा विरोध
- नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करताना होणारे वाद
- एकच ठेकेदार, त्याच्याकडे मनुष्यबळाची कमतरता
- ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना न जुमानणारे वाहनचालक
- नियोजित ठिकाणांऐवजी अन्यत्र वाहने उभी करून कोंडीत भर
- कारवाईसाठी पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता

‘पे ॲंड पार्क’चे दर (प्रतितास)
वाहनांचा प्रकार / शुल्क (रुपयांत)
दुचाकी व तीन चाकी / ५
चारचाकी हलकी / १०
टेम्पो व मिनीबस / २५
ट्रक, खासगी बस / १००
(शुल्क दर व आकारणीवर चर्चा)

‘पे ॲंड पार्क’ची ठिकाणे
- भोसरी- निगडी टेल्को रस्ता
- भोसरी- निगडी स्पाइन रस्ता
- नाशिक फाटा- वाकड बीआरटी रस्ता
- जुना मुंबई-पुणे रस्ता
- चिखली-चिंचवड-हिंजवडी जिल्हा मार्ग
- काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता
- औंध- रावेत बीआरटी रस्ता
- निगडी- वाल्हेकरवाडी रस्ता
- टिळक चौक ते बिग इंडिया चौक रस्ता
- थेरगाव गावठाण रस्ता
- नाशिक फाटा ते मोशी (नाशिक महामार्ग)
- चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ता

उड्डाणपुलाखाली व ऑफ स्ट्रीट पार्किंग
- रॉयल ग्लोरी सोसायटी वाकड

- रहाटणी स्पॉट - १८ मॉल
- अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी
- रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड
- भक्ती-शक्ती फ्लाय ओव्हर निगडी
- संत मदर तेरेला उड्डाणपूल चिंचवड
- चापेकर चौक ब्लॉक -१ चिंचवड
- चापेकर चौक ब्लॉक -२ चिंचवड
- पिंपळे सौदागर वाहनतळ
- मधुकर पवळे उड्डाण पूल निगडी

पिंपरी, चिंचवड अशा मध्यवर्ती भागात कामानिमित्त आल्यानंतर वाहन लावायचे कुठे? असा प्रश्न पडतो. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पार्किंग पॉलिसी गरजेची आहे. आता हेच बघा, इतका रुंद मोठा रस्ता (पुणे-मुंबई महामार्ग) आहे. पण, गाड्या वेड्यावाकड्या लावल्या आहेत. कोणी उभी लावली, कोणी आडवी लावली आहे. कोणी तिरपी लावली आहे. आता मी कुठे व कशी गाडी लावायची हा विचार करतोय. हे टाळण्यासाठी पे ॲंड पार्क आवश्यक आहे.
- मंगेश ठाकूर, मोशी

शहरातील रस्त्यांच्या कडेला उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांसाठी व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ‘पे ॲंड पार्क’ बाबत पोलिस व महापालिका प्रशासनासोबत चर्चा झाली. त्यात एका एजन्सीने पार्किंग पॉलिसीच्या मॉडेल्सबाबत सादरीकरण केले. ‘पे ॲंड पार्क’साठी काही ठिकाणी राखीव ठेवावीत. योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत चर्चा झाली.
- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग
---
फोटोः 31749