सायबर पोलिस ठाणे नक्की आहे तरी कुठे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर पोलिस ठाणे नक्की आहे तरी कुठे ?
सायबर पोलिस ठाणे नक्की आहे तरी कुठे ?

सायबर पोलिस ठाणे नक्की आहे तरी कुठे ?

sakal_logo
By

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. आयुक्तालयाच्या हद्दीत स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रारींचा निपटारा करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. सायबर ठाण्याला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सायबर गुन्ह्यांचे स्वरूप ः
सध्या प्रत्येक गोष्टीत इंटरनेटचा वापर वाढला आहे. ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढले असून, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. दरम्यान, सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. लिंकवर क्लिक करायला लावून, ओटीपी शेअर करण्यास भाग पाडत ऑनलाइन डल्ला मारणे, अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करत पैसे उकळणे, सोशल मीडियावर बदनामी करणे, अशा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या गुन्ह्यांच्या तपासासाठी आयुक्तालयात पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही.

सध्यस्थिती ः
गुन्हे शाखेअंतर्गत केवळ एक सायबर पोलिस ठाणे आहे. येथे अधिकारी व कर्मचारी अपुरे आहेत. प्राथमिक तपासानंतर प्रकरण गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात पाठवले जाते. तेथे तज्ज्ञांचा अभाव असल्याने तपासात अडचणी येतात. त्यामुळे प्रकरण पुन्हा सायबर सेलकडे येते. यामुळे तक्रारदाराला मनस्ताप सहन करावा लागतो. स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे होण्यासाठी आयुक्तालयाकडून वारंवार पाठपुरावा सुरु आहे. ९ नोव्हेंबर २०२० व १९ ऑक्टोबर २०२१ ला पोलिस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. यानंतर गृह, अर्थ, प्रशासन आदी विभागांची मंजुरी आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात सायबर ठाणे कधी निर्माण होणार याकडे लक्ष लागले आहे.


-------------------
दोन अधिकाऱ्यांची नेमणूक
सायबर सेलसाठी एकूण आठ अधिकारी, ६४ कर्मचाऱ्यांची मागणी आहे. चार दिवसांपूर्वीच परिमंडळ एक व दोनसाठी प्रत्येकी एका पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली.
--------
अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
सायबर सेलकडून प्रत्येक पोलिस ठाण्यासह सहायक आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, तीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जेणेकरून ठाणे स्तरावर येणाऱ्या तक्रारींचा तपास करणे शक्य होऊ शकते.
-------------------------------
स्वतंत्र सायबर सेल पोलिस ठाण्याबाबतचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यास मंजुरी मिळून स्वतंत्र ठाणे झाल्यास तपासाला गती मिळेल. मनुष्यबळही उपलब्ध होईल. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. सायबर सुरक्षेबाबत आमच्या विभागाकडून जागृती केली जात आहे.
- डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल.


सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

२०२० - ५ हजार २६१
२०२१ - ६ हजार ४५१
२०२२ - ८ हजार ९८४
२०२३ (फेब्रूवारी पर्यंत ) - १ हजार ५८३