
तहसील कार्यालयावर शिक्षकांचे थाळीनाद आंदोलन
पिंपरी, ता. २० ः जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, या मागणीसाठी शिक्षकांनी पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर ‘थाळीनाद’ आंदोलन केले. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘शिक्षक एकजुटीचा विजय असो’, अशा घोषणाबाजी करून थाळीनाद करत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना व मुख्याध्यापक संघाकडून सोमवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. कर्मचारी संघटनांनी २० मार्चपासून ‘लक्षवेध सप्ताह’ सुरू केला आहे. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व इतर न्याय मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच क्रीडा संघटनांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या आडमुठी धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य विक्रम काळे, सदस्य-गोपीनाथ करंडे, अनिल गुंजाळ, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कैलास पवळे, सचिव मुख्याध्यापक संभाजी पडवळ, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष-निवृत्ती काळभोर, मुख्याध्यापक अजय रावत व सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. राहुल वाघमारे, पवळे व प्राचार्य विक्रम काळे यांनी मनोगतातून जुन्या पेन्शनसह सर्व मागण्या सरकार जोपर्यंत मान्य करीत नाहीत. तोपर्यंत संपातून माघार न घेता लढत राहायचे, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
31725
31726